भारतीय संस्कृतीला कर्तबगार महिलांचा वारसा – प्राचार्य डॉ. वसंत बिरादार

भारतीय संस्कृतीला कर्तबगार महिलांचा वारसा - प्राचार्य डॉ. वसंत बिरादार

अहमदपूर (गोविंद काळे) : प्राचीन काळामध्ये भारत हे एक मातृसत्ताक राष्ट्र होते. गार्गी, मैत्रेयी , लोपामुद्रा सारख्या विदुषी, महान कर्तबगार आणि ज्ञानी स्त्रिया या देशात होत्या. मात्र नंतरच्या काळात बाहेरुन आलेल्या आक्रमकांनी स्त्रीसत्ताक राज्य व्यवस्था नष्ट करून पुरुषसत्ताक व्यवस्था आणली. तेव्हापासून सातत्याने स्त्रियांचा अपमान होत आला आहे, मात्र हे आता थांबवले पाहिजे कारण स्त्री शक्ती जागृत झाली आहे . म्हणून प्रत्येकाने स्त्रियांचा मनातून आदर सन्मान केला पाहिजे ,असे प्रतिपादन ज्येष्ठ ललित लेखक व समीक्षक तथा महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील यांनी केले.

आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘ महिला सक्षमीकरण वास्तव आणि अपेक्षा ‘ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्रात प्राचार्य डॉ. बिरादार बोलत होते.
दूर दृश्य तथा’ गुगल मीट’ च्या द्वारे ऑनलाईन संपन्न झालेल्या या राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन आंध्रप्रदेश वरंगल येथील सातवाहन विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. मोहम्मद अली इकबाल यांनी केले. या चर्चासत्रात विषयतज्ञ म्हणून हैदराबाद येथील डॉ. अनुपमा आळवाईकर , डॉ. मीनाक्षी नांदापूरकर तसेच पुणे येथील सामाजिक कार्यकर्त्या डॉ. माधवी कवी , औरंगाबाद येथील ज्येष्ठ स्त्रीवादी कवयित्री तथा ललित लेखिका डॉ. ललिता गादगे यांनी मार्गदर्शन केले तर समारोपीय सत्राचे अध्यक्षपद महात्मा फुले महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी तथा आदर्श शिक्षिका माधवी चौकटे यांनी भूषविले.

यावेळी पुढे बोलताना आचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, स्त्रियांना आता कमजोर समजणे चुकीचे असून स्त्रियांनी सर्व क्षेत्रांमध्ये बाजी मारलेली आहे. त्यांच्या कार्याची योग्य ती दखल समाजव्यवस्थेने घेऊन त्यांना सन्मानाने वागविले जावे , यातच देशाचे हित आहे असेही ते म्हणाले. या राष्ट्रीय चर्चासत्राचे प्रास्ताविक संयोजक व समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ.सतीश ससाणे यांनी केले. सूत्रसंचालन हिंदी विभाग प्रमुख डॉ. नागराज मुळे यांनी केले; तर आभार प्रदर्शन इंग्रजी विभाग प्रमुख प्रा .आतिश आकडे यांनी केले. या चर्चासत्रात देशातील विविध अभ्यासकांनी ऑनलाइन सहभाग नोंदविला. मान्यवरांच्या हस्ते चर्चासत्रातील शोधनिबंधांच्या स्मरणिकेचेही यावेळी प्रकाशन करण्यात आले.

About The Author