उदगीरच्या बाजार समितीच्या माजी सभापती, सचिव व इतर सहा लोकाविरुद्ध गुन्हा दाखल
लातूर (प्रतिनिधी) : उदगीर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सिद्धेश्वर उर्फ मुन्ना पाटील, उपसभापती रामराव बिरादार, सचिव भगवान पाटील, मोहन गडीकर, हंगरगे, डी.एम. माने, अजय बिरादार, दिनकर कांबळे यांच्याविरुद्ध उदगीर शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 333 /22 कलम 420, 465, 466, 467, 468, 471, 34 भा. द. वी.प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. यासंदर्भात अधिक माहिती अशी की, माजी सभापती शिवाजीराव हुडे यांनी वरील आठ लोकांच्या विरुद्ध उदगीर शहर पोलीस स्टेशन येथे तक्रार अर्ज दाखल केला होता. सदरील तक्रार अर्ज मध्ये त्यांनी नमूद केले होते की, उदगीर येथील रहिवासी असून मला दोन मुले आणि तीन मुली आहेत. मी शेती आणि अडत व्यापारी व्यवसाय करत होतो. 1985 मध्ये अडतकरण्यासाठी परवाना घेतला होता. 93 – 94 मध्ये सदर परवाना शंकर हनुमंतराव हडे यांच्या नावाने करण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीर यांच्याकडे रीतसर अर्ज करून समितीच्या मंजुरीने सदरचा परवाना शंकर हूडे यांच्या नावे नामांतर झाला. त्यानंतर 99 मध्ये सदरचा परवाना पुन्हा रीतसर कृषी उत्पन्न बाजार समितीची मंजुरी घेऊन माझे नामे नामांतर केला. त्यानंतर सुमारे तीन महिन्यांनी त्याच वर्षी मी सदर परवाना माझी पत्नी सौ. कलावती शिवाजीराव हुडे यांचे नावे रीतसर कृषी उत्पन्न बाजार समितीची मंजुरी घेऊन नामांतर करून चालक-मालक बदल केला.
त्यानंतर पुन्हा सन 2011 मध्ये माझी पत्नी सो. कलावती हुडे यांनी सदरचा परवाना सो. स्वाती सचिन हुडे यांचे नावे रीतसर कृषी उत्पन्न बाजार समितीची मंजुरी घेऊन नामांतर करून चालक-मालक बदल केला. व सन 2018 पर्यंत कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीर यांनी प्रतिवर्षी रीतसर सदर परवाना नूतनीकरण करून दिलेला आहे.
मी सन 2012 ते 17 या काळात शेतकरी मतदारसंघातून निवडून येऊन कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीरचा सभापती म्हणून कामकाज केलेले आहे. त्यानंतर सन 2017 मध्ये नव्याने कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लागल्याने माझे शेतकरी गटातील उमेदवारी अर्जावर आक्षेप घेतला गेला, त्या आक्षेपाच्या अनुषंगाने खंडपीठ औरंगाबाद यांच्याकडे सदर आदेशाविरुद्ध दाद मागितली असता, बाजार समितीच्या मतदानास केवळ तीन दिवस शिल्लक राहिल्याने याचिकेतील आव्हानातील आदेशामध्ये हस्तक्षेप न करता मला सदर प्रकरण योग्य त्या प्राधिकरणाकडे सादर करण्यासाठी सांगण्यात आले. त्यानंतर निवडणुका संपन्न झाल्यानंतर पुन्हा मा. जिल्हा उपनिबंधक लातूर यांच्याकडे अर्ज सादर केला. तो अजूनही न्यायप्रविष्ठ आहे. मा. उच्च न्यायालय मुंबईच्या खंडपीठ औरंगाबाद यांच्या निर्णयाचा चुकीचा अर्थ काढून त्याचप्रमाणे जिल्हा उपनिबंधक लातूर यांच्याकडे सदर मुद्द्याबाबत आपला अर्ज प्रविष्ट असताना सुद्धा 30 मे 2019 रोजी कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीरचे सभापती, उपसभापती, सचिव व संचालक मंडळ यांनी चालक-मालक सो. हुडे नसून शिवाजी हुडे हेच आहेत. असा बेकायदेशीर ठराव घेतला. कृषी उत्पन्न बाजार समिती उदगीर यांनी घेतलेल्या या ठरावाच्या संदर्भात माझ्या नावे नूतनीकरण करण्यासाठी कधीही जाण्याचा प्रश्न नव्हता. तरीही नूतनीकरण करून फर्मचा अडत परवाना नूतनीकरणासाठी अर्ज केलेला नसताना सुद्धा माझ्या नावाचा बनावट अर्ज तयार करून माझे नावे नसलेल्या फर्मचा चालक शिवाजी हुडे असा बेकायदेशीर रित्या आडत परवाना नूतनीकरण कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, उपसभापती, अनुमोदक, सचिव, तत्कालीन सचिव व परवाना विभागाचे तीन कर्मचारी यांनी बेकायदेशीर रीतीने नमूद बनावट कागदपत्र तयार करून त्या आधारे नूतनीकरण करून माझी फसवणूक केलेली आहे. अशा पद्धतीची फिर्याद दिल्यावरून सदर प्रकरणी उदगीर शहर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरील प्रकरणी पोलीस निरीक्षक गोरख दिवे हे अधिक तपास करत आहेत. हा गुन्हा नोंदला गेल्याने राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
