महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयास आ. विक्रम काळे यांची सदिच्छा भेट
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे आ.विक्रम वसंतराव काळे यांनी भेट दिली. यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी प्राचार्य डॉ. बी.एम.संदीकर होते, तर मंचावर उपप्राचार्य डॉ.आर.के.मस्के, उपप्राचार्य सी.एम.भद्रे, प्रा.एस.एस.पाटील यांची उपस्थिती होती. आमदार काळे म्हणाले की, शिक्षक मतदार संघात आपण आजवर केलेल्या कामाचा आढावा घेतला तर आपल्याला समजेल की, शिक्षक अतिरिक्त होणार नाही याबद्दलची दक्षता, वैद्यकीय प्रतिपूर्ती बिलासाठी प्रयत्न, वरिष्ठ व निवड वेतनश्रेणीसाठी ऑनलाईन प्रशिक्षणासाठी प्रयत्न केले आहेत. पुढील काळात जुन्या पेन्शन योजना मंजुरीसाठी प्रयत्नशील असून तासिका तत्त्वावरील प्राध्यापकाचे मानधन वाढले पाहिजे. व त्यांना दरमहा मानधन मिळाले पाहिजे, यासाठी आग्रही भूमिका घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रा.एस.एस.पाटील यांनी आज पर्यंत आमदार काळे यांनी संस्था व महाविद्यालयास दिलेल्या योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. प्रास्ताविक प्रा.डॉ.आर.के.मस्के यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.प्रवीण जाहुरे यांनी तर आभार प्रा.डॉ.जयप्रकाश पटवारी यांनी मानले. या कार्यक्रमास राष्ट्रवादी शिक्षक संघाचे रामराव जाधव, मटके, यशवंत बिरादार, विनोद गुरमे, प्रा.महादेव खताळ यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक बहुसंख्येने उपस्थित होते.
