स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन
हेर (एल.पी.उगीले) : उदगीर तालुक्यातील हेर येथे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या व मित्र मंडळाच्या वतीने स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांच्या जयंतीच्या निमित्ताने मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन केले आहे.
गोरगरीब आणि सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी आपल्या आयुष्य वेचणारे, परंपरावादी समाजव्यवस्थेमध्ये उपेक्षित ठरवल्या जाणाऱ्या ओबीसी साठी दृष्टीदाते ठरलेले स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांच्या बद्दल आपले ऋण व्यक्त करण्यासाठी आणि समाजातील गोरगरिबांच्या डोळ्यांचे आजार दूर करण्यासाठी, तसेच वयोवृद्ध झाल्यामुळे त्यांच्या डोळ्यात काचबिंदू, मोतीबिंदू असे आजार झाले असतील तर, त्याचा उपचार वेळीच करता यावा. अशा उदात्ते हेतूने रोटरी क्लब आणि उदयगिरी लायन्स मित्र रुग्णालयाच्या मदतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
“अंधत्व मुक्त अभियान , टाळता येणारे अंधत्व टाळू या”हा विचार डोळ्यासमोर ठेवून दिनांक 12 डिसेंबर 2022 रोजी सकाळी दहा वाजल्यापासून मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. उदगीर येथील रोटरी क्लब ऑफ उदगीर सेंटर यांच्यावतीने व उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालय यांच्या सहकार्याने सदरील आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा. असे आवाहन संयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
दृष्टीदोष उपचारासाठी चाळीस वर्षानंतर प्रत्येक नागरिकांनी आपले डोळे तपासून घ्यावेत, कारण वयोमानानुसार डोळ्याच्या मागील पडदा ज्याला रेटिना असे म्हणतात. त्याचे आजार उद्भवू शकतात, तसेच काचबिंदू अर्थात डोळ्यातील दाब वाढल्याने डोके दुखते व दृष्टी कमजोर होते. मधुमेह व उच्च रक्तदाबामुळेही डोळ्याच्या मागील पडदा अर्थात रेटिनाचा आजार होतो. दृष्टी कमजोर होते. त्यामुळे वेळेच्या वेळी तपासणी करून घेतली जावी. मोतीबिंदूची लक्षणे पुढील प्रमाणे आहेत, मोतीबिंदू सोबतच फेको व एस आय सी एस शस्त्रक्रिया ही करून घ्यावी. हाताची बोटे तीन फूट अंतरावरून मोजता न येणे, तसेच जवळचे व दूरचे कमी दिसणे. यासोबतच लहान मुलांचे तिरळेपणा, अशा रोगावर तात्काळ उपचार करून घेतले जावेत. पन्नास वर्षांवरील व्यक्तींनी दृष्टीदोष निर्माण होण्याची शक्यता असल्याने नजर कमी झाल्यास किंवा अंधुक, धूसर, अस्पष्ट दिसू लागल्यास, उदयगिरी लायन्स नेत्र रुग्णालयाशी संपर्क साधावा आणि अशा शिबिरांचा फायदा गोरगरीब नागरिकांनी आवश्यक घ्यावा. असे आवाहन रोटरी क्लबचे अध्यक्ष रामेश्वर नीटुरे, उपाध्यक्ष व्यंकटेश कणसे आणि या शिबिराचे संयोजक भागवत केंद्रे आणि मित्र मंडळ यांनी केले आहे. या शिबिराच्या माध्यमातून जास्तीत जास्त गोरगरिबांनी या संधीचा लाभ घ्यावा. असेही आवाहन भागवत केंद्रे यांनी केले आहे.
