संघर्षमय जीवन जगणाऱ्या ध्येयवेढ्याची आत्मकहाणी म्हणजे जग बदल घालूनी घाव – प्राचार्य डॉ. कांबळे
उदगीर (एल.पी.उगीले) : पोतराजाच्या पोटी जन्मलेल्या एकनाथ आव्हाड यांनी जातीची पारंपारिक काम करत लाचारीने जगणं पसंद न करता मळलेली वाट धुडकावली, घर सोडलं, गाव सोडलं, कष्ट करत शिक्षण घेतलं. स्वतःच्या सुखात समाधान न मानता आदिवासीं, दलितांना वेठबिगारीतून बाहेर काढलं. अस्पृश्यता आणि जातीभेदा विरोधात गावोगाव संघर्ष मांडला. हजारो भूमिहीनांना गायरान जमिनी मिळवून दिल्या. अन्यायावर घाला घालीत नवं जग घडवण्याचा नवा पॅटर्न उभा केला. शिकलो तर जातीच्या गुलामगिरीतून मुक्त होऊ ही जाणीव उराशी बाळगून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा संदेश शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. या उद्देशाने आयुष्याची मुशाफिरी करताना मनात कुठलाही विध्वंसक हेतू न ठेवता जातिव्यवस्थे विरुद्ध संघर्षमय जीवन जगणाऱ्या ध्येयवेढ्या एकनाथ आव्हाडांची आत्मकहाणी म्हणजे “जग बदल घालूनी घाव” होय असे मत प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे यांनी व्यक्त केले.
वाचक संवादचे 279 वे पुष्प प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे यांनी अॅड.एकनाथ आव्हाड यांच्या जग बदल घालुनी घाव या आत्मकथनपर साहित्यकृतीवर संवाद साधून गुंफले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अॅड. रमाकांत मध्ववरे हे होते. पुढे बोलताना डॉ. कमलाकर कांबळे म्हणाले, जाती व्यवस्थे विरुद्धची अस्वस्थता, वर्ग नि वर्ण संघर्ष या सर्व बाबींचा सर्जनशील आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करून उपेक्षितांसाठी सेवाभावाने कार्य करताना जेव्हा विचारांना मुरुड घालावी लागायची तेव्हा बंड करणारे एकनाथ आव्हाड. जात व्यवस्थेने गुन्हेगार ठरवलेल्या भूमीही निरक्षर आदिवासी पैकी काहींनी चोऱ्या मार्याचा व भिक मागण्याचा व्यवसाय चालू केले. यांनी स्वतःची वेगळी बोलीभाषा, खानाखुणांची भाषा आणि चिन्हांची भाषा तयार केली अशा वेळी परक्या विरुद्ध लढण्यापेक्षा स्वकीया विरूध लढने अवघड असतं. असे बोलताना यातील अनेक किस्से सांगितली.
यावेळी झालेल्या चर्चेत अर्चना पैके, डॉ. म.ई.तंगावार आदींसह अनेकांनी सहभाग नोंदवला. यानंतर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडच्या आधीसभा सदस्य पदी विद्यापीठच्या इतिहासात पहिल्यांदाच निवड झालेले शिवाजी महाविद्यालय उदगीरचे ग्रंथपाल डॉ. पवार विष्णू मनोहर यांचा आणि संपूर्ण कुटुंबच नेत्रदानाचा संकल्प केलेले चंद्रकांत काटमपल्ले व त्यांच्या सर्व कुटुंबाचा देखील यथोचित सत्कार करण्यात आला. हा सत्कार संवादक प्राचार्य डॉ. कमलाकर कांबळे, उस्मानाबाद , शिवाजी महाविद्यालय उदगीरचे प्राचार्य डॉ.विनायक जाधव , ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष अॅड. रमाकांत मध्ववरे आणि वाचक संवादचे संयोजक अनंत कदम यांच्या उपस्थितीत करण्यात आला.अत्यंत प्रभावी ठरलेल्या या कार्यक्रमाचे संचालन संयोजक अनंत कदम यांनी केले तर आभार प्रा.डॉ.बालाजी सूर्यवंशी यांनी मानले. यावेळी परिसरातील वाचक मोठ्या संख्येने उपस्थित होते.