इज्जत झाकण्यासाठी काँग्रेसपक्षाचा रामेश्वर ग्रामपंचायत निवडणुकीत केविलवाणा प्रयत्न
लातूर (प्रतिनिधी) : ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय सर्व गावकऱ्यांनी घेतला नऊपैकी आठ सदस्य बिनविरोध आले असताना काँग्रेसच्या काही विघ्न संतोषी मंडळींनी लातूर तालुक्यातील रामेश्वर ग्रामपंचायतीची निवडणूक लादून दोन उमेदवार उभे केले दोन्ही उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाले असताना अपक्ष निवडून आलेल्या सरपंचाला कवठाळून स्वतःची पाठ थोपटून घेण्याचा आणि इज्जत झाकण्याचा केविलवाणी प्रयत्न काँग्रेसकडून रामेश्वर ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत केला बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाने अशी च स्थिती झाली आहे.
लातूर तालुक्यातील मौजे रामेश्वर येथील दहा-बारा गावची सेवा सहकारी सोसायटीची निवडणुक पाच सहा महिन्यापुर्वी शेतकऱ्यांचे हित डोळयासमोर ठेवून भाजपाचे नेते राजेश कराड यांच्या पुढाकारातून आणि आप्पा मुंडे, लक्ष्मण पाटील, काँग्रेसचे जेष्ठ नेते स्व. व्यंकटराव कराड यांचे बंधू मनोहर कराड, संग्राम गोरे, ज्ञानोबा टेकाळे, संजय भोसले, बाळासाहेब कदम, गोपाळ पाटील, अण्णासाहेब कदम यांच्यासह सर्वच पक्षाच्या नेत्यांनी एकत्र येवून सोसायटीची निवडणूक बिनविरोध केली. या निवडणुकीतून चेअरमन आणि व्हाईस चेअरमनपदी महिलांनाच काम करण्याची संधी देवून राजेश कराड यांनी नवीन पायंडा पाडला. सोसायटीचा कारभार महिलांच्या हाती देण्याची कदाचित राज्यातील पहिलीच घटना असावी.
सोसायटीप्रमाणेच रामेश्वर गावची ग्रामपंचायतीची निवडणुक बिनविरोध व्हावी हा विचार सर्वासमोर आला आणि त्यानुसार राजेश कराड, आप्पा मुंडे, लक्ष्मण पाटील, शरद पाटील, मनोहर कराड यांच्यासह गावातील प्रमुखांनी एकत्र बसून रामेश्वर ग्रामपंचायत बिनविरोध काढण्याचा सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ग्रामपंचायतीच्या नऊ सदस्यांपैकी आठ सदस्य बिनविरोध काढण्यात आले. सरपंच पदासाठी सागरबाई ज्योतीराम कराड याही बिनविरोध निघत असताना काँग्रेसच्याच तालुकास्तरावरील पुढाऱ्यांनी गावकऱ्यांची ईच्छा नसताना विकासरत्न विलासराव देशमुख पॅनलचे पुरस्कृत दोन उमेदवार देवून निवडणूक लादली. परिणामी संत गोपाळबुवा ग्रामविकास पॅनलच्या माध्यमातून सरपंच पदासाठी सागरबाई ज्योतीराम कराड आणि सदस्यपदापैकी तुळशीरामअण्णा कराड निवडणूक रिंगणात राहीले. त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या विघ्नसंतोषी पुढाऱ्यांनी सरपंच पदासाठी विश्वंभर चव्हाण आणि सदस्य पदासाठी शिवानंद कराड यांना उभे केले. काँग्रेसच्या या दोन्ही उमेदवाराचे मतदारांनी डिपॉझीट जप्त केले.
सरपंच पदाच्या उमेदवार सागरबाई कराड यांना ५१४ तर कॉगेसच्या विश्वंभर चव्हाण यांना ३४ मते मिळाली. सदस्य पदाच्या निवडणुकीत तुळशीरामअण्णा कराड यांना ३२० तर शिवानंद कराड यांना ३९ मते मिळाली. या निवडणुकीत सरपंच पदासाठी अपक्ष उमेदवार सचिन कराड हे ६१३ मते घेवून विजयी ठरले. सचिन कराड हे सागरबाई कराड यांचे सख्खे पुतणे आहेत अंतर्गत वादामुळे आणि घरगुती कलहातून त्यांनी स्वतः वैयक्तीक उमेदवारी दाखल केली होती. बिनविरोध निवडणुक करण्याचा सर्वानुमते निर्णय झाल्याने राजेश कराड यांना धोका होईल याचा अंदाज आला नव्हता. केवळ स्वार्थी मतलबी राजकारणातून देशमुखाच्या पिलावळांनी बिनविरोध निवडणूकीच्या निर्णयाला छेद दिला.
विकासरत्न विलासराव देशमुख पॅनलच्या दोन्ही उमेदवाराचे डिपॉजीट जप्त झाले असताना स्वतःची इज्जत झाकण्यासाठी अमिष दाखवून, दबाव आणून अपक्ष सरपंच सचिन कराड यांना कवटाळून काँग्रेसचा सरपंच म्हणणे हे सहकार महर्षींना, काँग्रेसच्या पुढाऱ्यांना शोभा देत नाही. बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना अशा प्रकारची चर्चा लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघात सुरू आहे. जर काँग्रेस पुरस्कृत पॅनलमधुन उभा राहीलेला उमेदवार विजयी झाला असता तर सत्कार करणे उचीत वाटले असते. मात्र आपल्या उमेदवाराचे डिपॉजीट जप्त होवून अपक्षाला कवठाळून स्वतःची पाठ थोपटून घेणे हे कितपत योग्य आहे असा प्रश्न नागरीकांतून व्यक्त केला जात आहे.
