निडेबन येथील जलजीवन मिशन योजनेसाठी अंदाजे 19 कोटी 62 लाख 82 हजार रुपये मंजूर

निडेबन येथील जलजीवन मिशन योजनेसाठी अंदाजे 19 कोटी 62 लाख 82 हजार रुपये मंजूर

उदगीर (एल. पी. उगिले) : उदगीर आणि जळकोट या दोन्हीही तालुक्यात ग्रामीण भागात उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या बिकट होत असते. कित्येक गावासाठी तर पाण्यासाठी टँकरची सुविधा करावी लागते. पिण्याच्या पाण्याचे प्रश्न कायम मिटले पाहिजेत, हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून उदगीरचे आ. संजय बनसोडे यांनी महाराष्ट्र शासनाकडून संपूर्ण विधानसभा मतदारसंघासाठी ग्रामीण भागातील माय माऊलींना पाण्यासाठी भटकंती करावी लागू नये. असा उदात्ते हेतू ठेवून, जलजीवन मिशन योजना मंजूर करून घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून निडेबन या गावासाठी अंदाजे 19 कोटी 62 लक्ष 82हजार इतक्या किमतीच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याबाबतची प्रलंबित असलेली मागणी मान्य करण्यात आली आहे. निडेबन साठी दरडोई दररोज 55 लिटर या क्षमतेने पाणीपुरवठा करण्यासाठी 1823 इतका दरडोई खर्च असलेल्या नळ पाणीपुरवठा योजनेच्या अर्थात 19 कोटी 62 लक्ष 82 हजार इतक्या ढोबळ किमतीच्या अंदाजपत्रकास व आराखड्यास जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत अटी आणि शर्तीच्या अधीन राहून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. अशी अधिकृत माहिती उदगीरचे आ. संजय बनसोडे यांनी दिली आहे.

सदरील योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत करण्यात यावी, योजनेची अंमलबजावणी पूर्ण झाल्यानंतर ती संबंधित कार्यकारी अभियंता यांच्याकडून योजना प्रत्यक्षात पूर्ण झाली आहे. या आशयाची सूचना मिळाल्यानंतरच्या दिनांकापासून एक महिन्याच्या आत योजना ताब्यात घेण्यास संबंधित ग्रामपंचायत जबाबदार राहील.

योजना प्रत्यक्षात पूर्ण झाल्यावर संबंधित कार्यकारी अभियंता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जिल्हा परिषद व संबंधित ग्रामपंचायतीच्या अधिकारी यांनी योजनेची संयुक्त पाहणी आयोजित करावी, आणि अशा पाहणीत कोणतेही दोष आढळून आल्यास योजना ताब्यात देण्यापूर्वी ते दोष सुधारण्यात यावेत. अशाही सूचना करण्यात आल्या आहेत. योजनेची अंमलबजावणी पूर्ण झाल्यानंतर किमान एक वर्ष योजना चालविणे कंत्राटदारावर बंधनकारक राहील, योजना यशस्वीरीत्या पूर्ण झालेली आहे. याची खात्री महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने करावी. तसेच योजनेच्या देखभाल दुरुस्तीसाठी शासनाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचा अमल केला जावा.

योजनेची अंमलबजावणी होऊन कंत्राटदारा मार्फत योजना किमान एक वर्ष चालविण्यात येणार असली तरी ग्रामस्थांकडून या एक वर्षाची पाणीपट्टी वसूल करण्यात यावी. वसूल करण्यात आलेली पाणीपट्टी योजना चालविणाऱ्या संस्थेस देण्यात यावी. सदरील योजनेची कामे विहित पद्धतीने ई निविदा मागवण्यात येऊन केली जावी. योजनेसाठी आवश्यक भूसंपादन व इतर सर्व परवानगी विहित वेळेत प्राप्त करून घेण्यात याव्यात. सदरील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचा वापर हंगाम स्वरूपात होऊ नये, याकरता योजनेत समाविष्ट गावातील अस्तित्वातील योजना चालविण्यात येणार नाही. याची हमी ग्रामपंचायतकडून घेण्यात यावी. यासह इतरही काही अटी शर्ती ठरवण्यात आले आहेत. त्या अटीच्या अधीन राहून सदरील योजना मंजूर करण्यात आल्याचे पत्र महाराष्ट्र शासनाचे कक्षअधिकारी डॉ. रवींद्र भराटे यांनी दिले आहे.

जलजीवन मिशन योजनेअंतर्गत मौजे निडेबन, ता. उदगीर जि. लातूर नळ पाणीपुरवठा योजनेच्या प्रस्ताविक मान्यता देण्याबाबतचा आदेश 9 डिसेंबर 2022 रोजी शासनाने, अर्थात महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग यांच्या वतीने परिपत्रक काढून दिला आहे.

उदगीर विधानसभा मतदारसंघात प्रत्येक गावात आणि प्रत्येक घरात नळाद्वारे स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जावे. अशी धडपड लोकप्रतिनिधी म्हणून आपली असलीच पाहिजे, ते आपले आद्य कर्तव्य आहे. ग्रामीण भागात पिण्याचे शुद्ध पाणी उपलब्ध झाले नाही, म्हणून पावसाळ्याच्या सुरुवातीला तसेच पाणीटंचाईच्या दरम्यान उन्हाळ्यातही गोरगरिबांना वेगवेगळे आजार, रोगराई पसरते. या गोष्टीचे गांभीर्य विचारात घेऊन प्रत्येक घरात पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध व्हावे. या हेतूने आपण या योजनेची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न केले, असेही आ. संजय बनसोडे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.

About The Author

error: Content is protected !!