पोलीस पाटलांच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय कृती समिती शांत बसणार नाही – भारतीताई रोडगे पाटील

पोलीस पाटलांच्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय कृती समिती शांत बसणार नाही - भारतीताई रोडगे पाटील

उदगीर (एल. पी. उगीले) : अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्या पुर्ण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील कृती समीतीचा मोर्चा बुधवार 21 डिसेंबर रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनावर काढण्यात आला. कृती समितीवर विश्वास ठेवत राज्याच्या कानाकोपऱ्यातील जवळपास 15 हजारपोलीस पाटलांनी या मोर्चात सहभाग नोंदविला.

या मध्ये लातूर जिल्ह्यातील पोलीस पाटलांनी या महामोर्चास उत्तम प्रतिसाद दिला आहे. कृती समिती या विश्वासाला बिलकुल तडा जाऊ देणार नाही. या सर्व मागण्या मान्य होई पर्यंत कृती समितीच्या सदस्यांना शांत बसुन चालणार नाही, गरज पडल्यास हा लढा कायम चालू ठेवून जो पर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत हा लढा असाच सुरु असणार याची ग्वाही महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील कृती समितीच्या समन्वयक सौ.भारतीताई रोडगे पाटील यांनी दिली.

राज्यातील पोलीस पाटलांच्या अनेक मागण्या जसे की,पोलीस पाटलांना किमान वेतन मिळवावे, 1967 च्या अधिनियमातील बदल, पेन्शम योजना किंवा सेवानिवृत्ती नंतर एक रक्कमी मदत, आजपर्यंत निघालेल्या शासकीय आदेशाची अंमलबजावणी तात्काळ केली जावी, अशा अनेक मागण्या गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहेत. या मागण्यांसाठी राज्यातील विविध संघटना आपापल्या स्तरावरून ही लढाई लढत होते. संघटना संघटनात वाद लावून, मतभेद करून गटबाजीला खतपाणी घालण्याचा प्रयत्न केला जाऊ नये. किंवा प्रशासनास तशी संधी मिळू नये. यासाठी राज्यातील पोलीस पाटलांनी पुढाकार घेत 9 संघटनांना एकत्र आणले. कृती समितीच्या माध्यमातून प्रशासन दरबारी लोकशाही मार्गाने हे आंदोलन चालू होते.

अधिवेशना पूर्वी या आंदोलनास यश न आल्याने बुधवार दि. 21 डिसेंबर 2022 रोजी कृती समितीच्या माध्यमातून महामोर्चेचे आयोजन करण्यात आले होते. यात कृती समितीच्या शिष्टमंडळाने राज्याचे गृहमंत्री मंत्री ना. देवेंद्रजी फडवणीस यांना निवेदन देऊन जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात मागण्या संदर्भीय बैठक आयोजित करण्याचे शब्द घेतले आहे. महाराष्ट्र राज्य पोलीस पाटील कृती समिती स्थापन होण्यासाठी माऊलीदादा मुंढे परळी, महेशंकर पाटील उमरगा, प्रमोद माळी उस्मानाबाद, आण्णासाहेब कोळेकर तुळजापूर, नंदू हिवसे काटोल,सौ.सीमाताई वारघडे पुणे, दीपक गिरी सातारा या पोलीस पाटलांनी अथक परिश्रम घेतल्याची व या मागण्या जो पर्यंत पोलीस पाटलांच्या पदरात पडत नाहीत. तो पर्यंत कृती समितीच्या इतर सदस्यांना शांत बसू देणार नसल्याची चर्चा कृती समितीच्या समन्वयक सौ.भारतीताई रोडगे पाटील करीत आहेत.

About The Author

error: Content is protected !!