युवकांनी उत्साहाने विकास कामे करावीत, निधी कमी पडणार नाही – आ. पाटील
चाकूर( एल.पी.उगीले) : अहमदपूर आणि चाकूर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या नूतन सरपंचांनी, सदस्यांनी विकास कामासाठी पुढाकार घ्यावा. आणि उत्साहाने काम करावे. असे आवाहन अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी केले.
चाकूर तालुक्यातील एक प्रतिष्ठित आणि मोठी ग्रामपंचायत म्हणून चापोली ग्रामपंचायत ओळखली जाते. या ग्रामपंचायतीवर भालचंद्र चाटे हे खूप मोठ्या मताधिक्याने सरपंच म्हणून निवडून आले, तसेच सांडोळ महांडूळ या ग्रुप ग्रामपंचायतीवर सरपंच म्हणून प्रकाश बंडे हे मोठ्या मताधिक्याने विजय झाल्याबद्दल तसेच त्यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते सदस्य म्हणून विजयी झाल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष या नात्याने आ. बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे उदगीरचे प्रतिष्ठित व्यापारी तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुदर्शन मुंडे यांच्यासह इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार झाल्यानंतर ग्रामस्थांच्या वतीने तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आ. बाबासाहेब पाटील यांनी केलेल्या विकास कामाची दखल म्हणून त्यांचाही सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बोलताना बाबासाहेब पाटील यांनी स्पष्ट केले की, तरुणांनी बिनधास्तपणे विकास कामासाठी पुढे यावे. ग्रामपंचायतीच्या म्हणजेच त्या गावच्या विकासासाठी निधी कधीही कमी पडू दिला जाणार नाही. शासनाच्या कित्येक लोक कल्याणकारी योजना आहेत, तसेच या भागाचा आमदार म्हणून मी सदैव आपल्या सोबत असणार आहे. तुम्ही विकासासाठी पुढे या, मी तुमच्या बरोबर आहे, असे सांगितले.
