चोरीस गेलेले सोन्याच्या दागिनेसह 52 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
लातूर (एल.पी.उगीले) : लातूर जिल्ह्यातील चोऱ्या, घरफोड्या, जबरी चोऱ्या अशा अनेक गुन्ह्याच्या संदर्भात दखल घेऊन त्याचा तपास करण्याच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सर्व पोलीस स्टेशनला दिल्या होत्या. त्या अनुषंगाने चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिनेसह 52 हजार रुपयांचा मुद्देमाल ही पोलिसांनी जप्त केला आहे.
याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, दिनांक 23 डिसेंबर रोजी पोलीस ठाणे शिवाजीनगर हद्दीतील जुना औसा रोड परिसरातील एका घरात अज्ञात चोरट्यांने प्रवेश करून घरातील 52 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन शिवाजीनगर येथे गु.र.नं. 514/2022 कलम 454,380 भा.द.वी. प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी निर्देशित करून महत्त्वाच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ.अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर जितेंद्र जगदाळे यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे शिवाजीनगरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दयानंद पाटील यांचे नेतृत्वात पोलीस पथक नेमुन तपासाबाबत सूचना देण्यात आल्या होत्या.
तपासा दरम्यान पोलीस पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावरून आरोपी नामे अक्षय राम तेलंगे, (रा. गोपाळ नगर ,लातूर), प्रशांत अर्जुन शिंदे, (रा. पाखरसांगवी, लातूर), प्रफुल प्रकाश पवार, (राहणार गिरवलकर नगर, लातूर) यांना दिनांक 26 डिसेंबर 2022 रोजी ताब्यात घेऊन त्यांच्या कडे गुन्ह्याबाबत विचारपूस केले असता, त्यांनी सदरच्या गुन्ह्याची कबुली देऊन गुन्ह्यात चोरलेला मुद्देमाल 52 हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने काढून दिल्याने ते जप्त करण्यात आले आहे.
गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस अंमलदार शिरसाठ करीत आहेत. सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी वरिष्ठांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरिक्षक दयानंद पाटील यांचे नेतृत्वातील टीम मधील पोलीस उपनिरीक्षक भगवान मोरे, सहाय्यक फौजदार रामचंद्र ढगे, पोलीस अंमलदार महेश पारडे, अभिमन्यू सोनटक्के, अंगद शिरसाट, युवराज गिरी, वालचंद नागरगोजे, बालाजी कोतवाड, पद्माकर लहाने, काकासाहेब बोचरे यांनी गुन्ह्याचा कौशल्यपूर्ण तपास करून गुन्ह्याची उकल करून गुन्हा उघडकीस आणला.गुन्ह्यात चोरलेला सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल शंभर टक्के हस्तगत करण्याची कामगिरी बजावली आहे. त्याबद्दल पोलिसांचे कौतुक केले जात आहे.
