माळेगावात माणसा परीस ‘टॅलेंटेड’… म्हणजे लय ‘हुश्शार’ ‘गाढव’ आलंय…!

माळेगावात माणसा परीस 'टॅलेंटेड'… म्हणजे लय 'हुश्शार' 'गाढव' आलंय…!

प्राचार्य डॉ. वसंत बिरादार
पन्नालालच्या तंबुतून

लोहा,
जो माणूस निर्बुद्ध आहे… बिनडोक आहे… आपल्या बुद्धीचा वापर करीत नाही…अशा माणसाला आपण… ‘ढ’… ‘निर्बुद्ध’…’गाढव’ म्हणतो… म्हणजेच ‘गाढव’ उपमा देऊन त्याचा मूर्ख म्हणून उल्लेख करतो … पण, या सर्वांना फाटा देणारा… ‘पन्नालाल’ नावाचा… अतिशय ‘टॅलेंटेड’ गाढव… लय ‘हुश्शार’ असून बरोब्बर माणूस शोधतो… दरवर्षी माळेगावच्या यात्रेत… तो यात्रेकरुचे आकर्षण ठरतो आहे.
एखादा माणूस मूर्खासारखा वागत असेल तर त्याला आपण गाढव म्हणतो…पण हेच गाढव जेव्हा प्रचंड हुश्शार बनते… सी. आय. डी. मध्ये केल्यासारखे वागू लागते… नव्हे तसे करतेच…तेव्हा ‘गाढवा’ बद्दलचे आपले सगळे विचार ‘फेल’ ठरतात… माळेगावच्या यात्रेत पंढरपूरहून गणेश इंगोले यांनी आपला ‘पन्नालाल’ नामक गाढवीन… माळेगाव यात्रेत घेऊन आलेले आहेत… ती गाढवीन असली तरी तिचे पुल्लिंगी नामकरण केले आहे…
ते गेल्या वीस वर्षांपासून न चुकता माळेगावच्या यात्रेत दाखल होतात… आपल्या या ‘पन्नालाल’ गाढवाला त्यांनी सर्व काही शिकवले आहे … जसे आपण कुत्र्याला… मुलाला…. माणसाला… शिकवतो तशाच पद्धतीने गाढवलाही शिकवले जाते… अन् गाढव शिकतेही… विशेष म्हणजे ते ४०दिवसातच … शिकते असे गणेश इंगोले यांनी सांगितले…
लोकांच्या नजरेत पन्नालाल हे गाढव असले… तरी आमच्या साठी तो ‘कामधेनू’ आहे… म्हणून ही गाढविन आहे… तिला चलाख बनवून माळेगाव यात्रेत आम्ही चांगली कमाई करून जातो…. असेही ते म्हणाले.
… अन् माणसाकडे जाऊन गाढव कानाचा निर्देश करतो !
‘पन्नालाल’ हा प्रेक्षकांना उभे राहण्यासाठी साकारण्यात आलेल्या गोल रिंगणात… त्याला मालकाने आत सोडल्यावर … तो रसिकांना त्याला कोणीही हात लावू नका… अशी सूचना देतो… नंतर तो एक दोन राऊंड घेतो… कोण कुठं थांबला ते… तो दमदार पावले टाकत टाकत… खालच्या नजरेनं बघून घेतो… मग त्याच्या मालकाने त्याला प्रश्न विचारतो… त्या प्रश्नांच्या संदर्भातली व्यक्ती कोण आहे..? ती सांग …?असे म्हटल्यावर …मग पन्नालाल त्या व्यक्तिच्या समोर जाऊन उभा राहतो…अन् आपल्या कानाद्वारे त्या व्यक्तीकडे निर्देश करतो .. म्हणजे हीच ती व्यक्ती आहे… असे तो अप्रत्यक्ष सांगतो…
पन्नालालचा मालक त्याला… काही रंजक… काही गंभीर…तर काही निरुपद्रवी…तर काही वेळा अडचणीचेही प्रश्न विचारतो… पैकी काही प्रश्न असे-
पन्नालाल यह बताओ… कि यात्रा मे इनमे से कोण लाईन मारने आया है…? इनमेसे कोणसा छोटा बच्चा है…? कोणाला प्रदेश वारी घडणार आहे..? कोणाच्या डोक्याचे टक्कल पडले आहे…? कोणाच्या पिशवीचा कलर पिवळा आहे…?शादी मे कोण ज्यादा खाना खाता है…? आपने बिवी को कोण डरता है…?अपने बिवी को कोण मस्का मारता है…? इन लेडीज मे से कौनसी लेडीज अपने पती पर गुसा करती है…? इनमेसे कोनसी औरत अपने मर्द के जेबसे पैसे निकालती है..?इनमे से कामचोर बहन कोन है…? इनमे से किस लडकी को अच्छा सासुराल मिलेगा…? असे एक नव्हे तर… अनेक प्रश्न त्या पन्नालालला मालक गणेश इंगोले विचारतो… मग ते कोणाला तरी सांगून गाढवाचे डोळे बंद करायला लावतो… अन् एखाद्याचा मोबाईल तिथेच असलेल्या पैकी… कोणाला तरी देतो… मग इकडे गाढवाचे डोळं उघडायला सांगतो … मग मालक गाढवाला म्हणतो पन्नालाल इथे मोबाईल चोरीला गेलेला आहे …तो मोबाईल कोणाचा आहे…? ते सांग…? असे म्हटल्या नंतर पन्नालाल गोल राऊंड घेतो… व ज्याचा मोबाइल होता त्याच्याकडे कानाने निर्देश करून याचा आहे असे दाखवतो…मग हा मोबाईल कोणी चोरला…?ते सांग…? असे म्हटल्यावर….तो राऊंड घेत …घेत… मोबाईल ज्याच्या खिशात आहे… त्याच्या समोर जाऊन पन्नालाल उभा राहून कानाने हा आहे असे सांगतो …
हे सर्व येथे ३०रूपयांचे तिकीट काढून आलेले रसिक असतात…ते उघड्या डोळ्याने बघतात… या बरोबरच कोणी नवरा बायको हा कार्यक्रम बघायला आले असतील… तर त्यातील एखाद्या पतीची… पत्नी कुठे आहे…? असे विचारल्यावर तो त्याच्याच पत्नी समोर जाऊन उभे राहतो… तसेच एखाद्याचा मुलगा कोठे आहे… हेही सांगतो… कार्यक्रम दहा ते पंधरा मिनिटांचा असतो… संपल्यानंतर सगळेच हसत हसत बाहेर पडतात…हे विशेष..!
होय, आमच्या हाती ‘गाढव’पणा आला…?
पन्नालाल नावाचे ‘गाढव’… भूतकाळ… वर्तमानकाळ… आणि भविष्य काळातील… भविष्य सांगतोय… हे पाहून आणि ऐकून आपण अचंबित होतो… विशेष, म्हणजे गाढविणीचे दूध… ६ ते ७ हजार रुपये लिटर… एवढ्या महाग भावाने विकत का मिळते…? याचे उत्तर गाढवाच्या या हुशारी वरून मिळून जाते … इथे माणूस प्रश्न विचारतो … अन् गाढव उत्तर देतो…! मग गाढवाला मेंदू नाही…? असे आपण कसे काय म्हणू शकतो..? गाढवाला मेंदू आहे … हे जगातल्या ग्वेनर्से या देशाला सर्व प्रथम कळले होते… म्हणून त्या देशाचा राष्ट्रीय प्राणी ‘गाढव ‘ हा आहे.
माणसां पेक्षा गाढवंच लय ‘हुश्शार’ आहेत … ‘टॅलेंटेड’ आहेत… म्हणून गाढवाला ‘गाढव’ म्हणण्याची चूक कोणत्याही भारतीयांनी करू नये… असा इशारा तमाम गाढवांनी दिला तर तो स्वीकाराहर्य असेल…!
पन्नालाल ‘गाढव’ एवढया सगळ्या प्रश्नांची उत्तरे… अंत्यत चतुराईने व अचूक कसं काय देतो…?हे जाणून घेण्याचा सदर प्रतिनिधींनी प्रयत्न केला… पण, हाती ‘गाढव’ पणा आला…? अचूक व समाधानकारक असे उत्तर काही मिळालेच नाही… इतके हे त्यांचे ज्ञान… अनाकलनीय दिव्य… आणि रहस्यमय आहे… म्हणून गाढवाला ‘गाढव’ म्हणण्याचा ‘गाढव’पणा कोणीही करू नये… हाच संदेश माळेगावसह… विविध यात्रांमधून हा ‘पन्नालाल’ देत तर नाही ना …?

About The Author

error: Content is protected !!