ग्रंथालय शाळेच्या दारी हा उपक्रम मुख्याध्यापकांनी यशस्वी करावा – सूर्यकांत शिरसे

ग्रंथालय शाळेच्या दारी हा उपक्रम मुख्याध्यापकांनी यशस्वी करावा - सूर्यकांत शिरसे

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर तालुक्यातील वाचन संस्कृतीला गती देण्यासाठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी आणि जिल्हा शिक्षणाधिकारी यांनी पुढाकार घेऊन प्रत्येक पुस्तकाला वाचक मिळावा आणि प्रत्येक वाचकाला पुस्तक मिळावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये शालेय पातळीवर ग्रंथालय शाळेच्या दारी हा उपक्रम राबवण्याच्या केलेल्या सूचना अत्यंत रास्त आहेत. यामुळे वाचन संस्कृतीला गतीतर येणारच आहे, शिवाय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी याचा फायदा होणार आहे. आजचा विद्यार्थी हा उद्याचा नागरिक असल्याकारणाने विद्यार्थी घडावा म्हणून प्रत्येक शाळेच्या मुख्याध्यापकांनी ग्रंथालय शाळेच्या द्वारी या उपक्रमास उत्स्फूर्तपणे सहकार्य करावे असे आवाहन श्यामलाल स्मारक सार्वजनिक वाचनालयाचे ग्रंथपाल तथा ग्रंथ मित्र सूर्यकांत शिरसे यांनी केले आहे.

कोणतीही व्यक्ती, समाज वा राष्ट्राच्या जडणघडणात ग्रंथ व ग्रंथालयाचे अनन्यसाधारण असे महत्व आहे. माहिती, ज्ञान, मनोरंजन आणि जिज्ञासापुर्तीचे साधन या दृष्टीने ग्रंथाचे महत्व आहे. म्हणुनच बौध्दिक विकासाचे शक्तीकेंद्र आणि सामाजिक विकासाचे उर्जा केंद्र म्हणून आपण वेळोवेळी आपले कर्तव्य बजावत आलेलो आहोत. याबरोबरच शिक्षण प्रसारासाठी, ज्ञान माहिती आणि मनोरंजन या बाबींचा प्रसार होणे काळाची गरज बनत चाललेली आहे. ही गरज आपल्याला वाचन चळवळ विकसित करून करता येणार आहे, त्यादृष्टीने हा उपक्रम कौतुकास्पद असल्याने विद्यार्थ्याला याचा फायदा मिळेल यासाठी मुख्याध्यापकांनी सक्रिय व्हावे असेही आवाहन सूर्यकांत शिरसे यांनी केले आहे.

आधुनिक काळामध्ये विशेषत: शालेय जीवनामध्ये विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करणे, त्यांना त्यांच्या आवडीची पुस्तके, ग्रंथ उपलब्ध करुन देणे, आवश्यक आहे. म्हणून काही विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. याचा भाग म्हणून शिक्षणाधिकारी कार्यालय (माध्यमिक), जिल्हा परिषद ,लातूर व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने व आपल्या सर्वांच्या सहभागाने विशेष अभियान हाती घेण्यात येत आहे. यामध्ये सार्वजनिक ग्रंथालयाने आपल्या सार्वजनिक ग्रंथालयाची माहिती गावातील, भागातील शाळांमध्ये जावून देण्यात यावी, शिक्षक व विद्यार्थ्यांना सभासद करुन घेण्यात यावे. व पुस्तके उपलब्ध करुन दयावेत. तसेच सोयीनुसार मुख्याध्यापकांच्या संमतीने बाल वाचन साहित्य ठराविक कालावधीसाठी उपलब्धतेनुसार पुसतकांचा संच पुरविण्यात यावा, व ठरलेल्या दिवशी शाळेत जावून तो संच बदलून दूसरा संच देण्यात यावा.

सार्वजनिक ग्रंथालयांनी यासाठी दोन स्वतंत्र देवघेव नोंदवही व सभासद नोंदवही तयार करावी. एक शाळा व एक ग्रंथालयासाठी असेल. ज्या गावामध्ये ग्रंथालय नाहीत, आशा शाळेनी निकटच्या गावातील, तालुकास्तरावरील ग्रंथालयाकडून 25 पुस्तकांचा संच 15 दिवसासाठी साखळी योजनेतून घेवून जावा व 15 दिवसानंतर सदर संच बदलून दूसरा संच घेण्यात यावा. मुख्याध्यापकांनी सदर उपक्रमाची जबाबदारी एका शिक्षकावर सोपवावी. या उपक्रमाचा शुभारंभ दि. 06 जानेवारी, 2023 रोजी एकाच वेळी सर्व जिल्हयामध्ये करण्यात यावा. या वेळी ग्रंथालयांनी ग्रंथप्रदर्शन ठेवून बाल वाचक सभासद नोंदणी करण्यात यावी. तसेच दर गुरुवारी शाळेच्या विद्यार्थ्यानी गावातील ग्रंथालयांना भेट देण्याचे नियोजन मुख्याध्यापकांनी करावे. याच बरोबर विद्यार्थ्यांकरीता वाचनसंस्कृतीस पोषक असे विविध कार्यक्रम,स्पर्धा घेणे, जेणे करुन आपल्या ग्रंथालयांना वाचक मिळतील व वाचक मिळत नाहीत या समस्येवर तोडगाही निघेल. उपक्रमाचा अहवाल दर महिन्याला मुख्याध्यापक यांनी शिक्षणाधिकारी कार्यालय,लातूर यांना तर सार्वजनिक ग्रंथालयांनी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय,लातूर यांचेकडे सादर करावा. अशाही सूचना याप्रसंगी सूर्यकांत सिरसे यांनी दिले आहेत.

About The Author

error: Content is protected !!