शिक्षणातूनच बालविवाहच्या समस्येचे उच्चाटन होईल -डॉ. सुचिता कापसे
अहमदपूर (गोविंद काळे) : अशिक्षित समाजामध्ये अंधश्रद्धा, स्त्रियांचे शोषण, हुंडाबळी व बालविवाह सारख्या समस्या मोठ्या प्रमाणात दिसतात. त्यामुळे आजच्या भौतिक युगात मुलींना शिक्षण दिले तर, त्या शिक्षित होतील आत्मनिर्भर बनतील आणि बाल विवाहासारख्या समस्यांचे समूळ उच्चाटन होईल, असे प्रतिपादन अहमदपूर येथे प्रसिद्ध वैद्यकीय अधिकारी डॉ. सुचिता कापसे यांनी केले. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष युवक शिबिर मौजे रुई दक्षिण ता. अहमदपूर येथे दिनांक २८डिसेंबर २०२२ पासून सुरू असून, या शिबिरा दरम्यान स्वच्छता, मतदार जनजागृती, बालविवाह प्रतिबंध जनजागृती, कोरोना प्रतिबंध जनजागृती, वृक्षारोपण, व्यसनमुक्ती यासह विविध उपक्रम राबविले जात आहेत. आजच्या सत्रात प्रा. डॉ. सीमा मोरे यांच्या अध्यक्षतेखाली ‘बालविवाहाची कारणे व दुष्परिणाम ‘ या विषयावर अहमदपूरच्या प्रसिद्ध वैद्यकीय अधिकारी डॉ. सुचिता कापसे व सामाजिक कार्यकर्त्या सौ. एस. एम. वतनी तसेच रुई ग्रामपंचायतच्या सदस्य सौ. वंदना देवकते आदी विचार मंचावर उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. सुचिता कापसे म्हणाल्या की, आजच्या तंत्रज्ञान युगामध्ये ही काही समाजामध्ये अशिक्षितपणा असल्यामुळे बालविवाह मोठ्या प्रमाणात होताना दिसून येतात. गरिबी व अशिक्षितपणामुळे आई-वडील आपल्या मुलींचे विवाह अल्पवयात घडून आणतात व आपल्या डोक्यावरील ओझं कमी झाल्याचे मानतात. परंतु, त्या कोवळ्या मनावर बालविवाह मुळे वेगवेगळ्या समस्या निर्माण होतात व अशा मुळे अल्पवयातच मुलींचे जीवन उध्वस्त होते. त्यामुळे मुलींना शिक्षण देणे अत्यंत आवश्यक आहे, असेही त्या म्हणाले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्त्या सौ. वतनी यांनी ही मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. विश्वनंदा नंदवंशी यांनी केले तर, आभार एनएसएस विद्यार्थी प्रतिनिधी कु.गायत्री पदमपल्ले हिने मानले. प्रसंगी कार्यक्रमाधिकारी डॉ पांडुरंग चिलगर व सतीश ससाने डॉ संतोष पाटील डॉ अभिजीत मोरे यांच्यासह रुई गावातील महिला महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
