तपासाच्या नावाने नुसती बोंबाबोंब !!
नव्या गुन्ह्याला फुटत आहेत कोंब !!
एलसीबी कडून ग्रामीण पोलिसांच्या कर्तबगारीचे धिंडवडे!!!
उदगीर (एल पी उगीले) : उदगीर परिसरामध्ये दररोज गुन्हेगारी वाढत चालली आहे, स्थानिक पोलीस मात्र तपासाच्या नावाने बोंबाबोंब मारत एक दुसऱ्यावर जबाबदारी झटकून मोकळे होत आहेत. त्यामुळे गुन्हेगारांचे चांगलेच फावते आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे हे कर्तबगार असल्यामुळे अशा निर्ढावलेल्या पोलिसांना धडा शिकवण्यासाठी म्हणून सर्व जबाबदारी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडे सोपवली आहे. त्यामुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाकडून एका पेक्षा एक, दर्जेदार कामगिरी होताना दिसून येत आहे. उदगीर ग्रामीण परिसरात अवैध दारू मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याची ओरड असताना देखील स्थानिक पोलीस गप्प का? हा मोठा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेला आहे. असे असताना देखील स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या कर्तबगार पथकाने उदगीर ग्रामीण पोलिसांच्या नाकर्तेपणावर टिच्चून उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चोरट्या मार्गाने विक्रीस जाणाऱ्या अवैध दारू विक्रीच्या संदर्भात आणि बारकाईने नजर ठेवून छापा मारला असता, अवैध दारू विक्री करण्यासाठी, दारूची वाहतूक करणाऱ्या राहुल लक्ष्मण कांबळे (वय 29 रा. लोहारा ता. उदगीर) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून 16 बॉक्स देशी दारू आणि सदरील अवैध दारू वाहतुकीसाठी उपयोगात आणली जाणारी कार असा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरील कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे ज्येष्ठ पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे, पोलीस अंमलदार अंगद कोतवाड, माधव बिलापट्टे, राजेश कंचे, तुराब पठाण, राजाभाऊ मस्के, सचिन मुंडे बालाजी जाधव, रवी कानगुले यांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे.
अवैध दारू विक्रीच्या अनुषंगाने तसेच बनावट व विषारी दारूच्या संदर्भात वेळोवेळी अनेक नागरिकांनी तक्रारी देऊन देखील, ग्रामीण पोलिसांकडून या अनुषंगाने कोणतीच कारवाई झाली नसल्याची जणू ही पावतीच असल्याचे बोलले जात आहे. मांजर डोळे मिटून दूध जरी पीत असले तरी ते इतरांना दिसतेच! तशाच पद्धतीने आपले हितसंबंध जोपासत अशा अवैध धंद्यांना ग्रामीण पोलिसांनी डोळे झाक करून चालना दिली असली तरी, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे गजानन भातलवंडे यांच्यापासून ही गोष्ट लपून राहू शकत नाही. उदगीर येथे घडणाऱ्या अवैध धंद्याच्या संदर्भात जी गोष्ट लातूर शहरात समजते. ती गोष्ट उदगीरच्या पोलिसांना कळू नये? हे नवल आहे, असे म्हणणे हास्यास्पद होईल! या अवैध धंद्याला चालना देणारे नेमके कोण आहेत? याचाही शोध घेणे गरजेचे झाले आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या या कर्तबगार पथकाने संपूर्ण जिल्हाभर आपली वचक निर्माण करत जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे आणि अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर अजय देवरे यांच्या सूचनांचे तंतोतंत पालन करत ज्येष्ठ पोलीस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या मार्गदर्शनाखाली उदगीर ग्रामीणच्या सोबतच लातूर शहरालगत असलेल्या विराट नगर खाडगाव रोड परिसरात देखील अवैध धंद्यावर छापा टाकला आहे. त्या ठिकाणी प्रतिबंधित असलेला गुटखा आणि सुगंधित तंबाखूची चोरट्या विक्रीचा व्यवसाय करत असलेल्या ठिकाणी धाड टाकण्यात आली. यावेळी एका आरोपीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याच्याकडून बराच गुटखा आणि सुगंधित पानमसाला जप्त करण्यात आला आहे. तसेच सदरील प्रतिबंधित गुटखा, सुगंधित पान मसाला याची वाहतूक करण्यासाठी वापरात येणारे पिकअप वाहन असे एकूण 18 लाख 33 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबत एमआयडीसी पोलीस ठाणे येथे अमलदार अंगद कोतवाड यांच्या तक्रारीवरून फिरोज उमाटे (वय 30 वर्ष राहणार विराट नगर खाडगाव रोड लातूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उदगीर ग्रामीण पोलिस स्टेशन हद्दीमध्ये चालू असलेल्या अवैध दारू विक्रीवर आळा घालत 16 बॉक्स देशी दारू आणि वाहतुकीसाठी उपयोगात आणली जाणारी कार स्थानीक गुन्हे अन्वेषण विभागाने जप्त केली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या या कर्तबगारीला जनतेतून कौतुकाची थाप मिळत आहे. तसेच अशा अवैध धंद्याला चालना देणाऱ्या किंवा हेतूत: अशा अवैध धंद्याकडे डोळेझाक करणाऱ्या पोलीस कर्मचारी, अधिकारी यांच्या संदर्भात वरिष्ठ पातळीवरून चौकशी केली जावी. अशी ही मागणी केली जात आहे.