बीड जिल्ह्यात बनावट देशी दारूचा हैदोस धुल्ला!!राज्य उत्पादन शुल्क त्यांना कसा सोडणार खुला ?
बीड /ऍड. एल.पी.उगीले
सामान्यतः गोरगरीब कष्टकरी, अंग मेहनतीचे काम करणारे कामगार हे श्रम परिहार म्हणून किंवा शरीराचा थकवा जावा, म्हणून स्वस्तातली नशा करून आराम करत असतात. पुढे पुढे त्यांना त्या नशेची सवयच लागून जाते.
समाजामध्ये मौज मस्ती साठी नशा करणारे आणि शारीरिक थकवा घालवण्यासाठी नशा करणारे असे दोन वर्ग आढळतात. मौज मस्ती साठी जे नशा करतात, ते कोणतीही महागडी दारू पिऊन पैसा उधळतात. मात्र जे दुसऱ्या वर्गात येतात, कष्टकरी वर्ग ते कमीत कमी पैशांमध्ये चांगली नशा व्हावी, अशा पद्धतीची अपेक्षा ठेवून देशी दारू किंवा हातभट्टीची दारू पसंद करतात. मध्यंतरीच्या काळात हातभट्टीच्या दारूमध्ये नवसागराचे प्रमाण वाढल्याचे लक्षात आल्यानंतर हातभट्टीच्या ऐवजी देशी दारूलाच पसंती देणाऱ्यांची संख्या वाढली. आणि याच गोष्टीचा गैरफायदा घेत झटपट श्रीमंत होण्याच्या नादात काही स्वार्थी प्रवृत्तीच्या लोकांनी समाजातील कष्टकरी, मेहनती आणि शारीरिक कष्ट केल्यानंतर चांगली विश्रांती मिळावी म्हणून देशी दारूचा आधार घेणाऱ्या तळीरामांच्या आरोग्याचा किंवा त्यांच्या भविष्याचा विचार न करता त्यांच्या कमजोरीचा विचार करून बनावट देशी दारू बनवून पैसा मिळवण्याचा प्रयत्न करण्याचे ठरवून, काही लोकांनी बीड जिल्ह्यामध्ये बनावट देशी दारूचा चक्क कारखानाच उभा केला.
कोणत्याही अवैध धंद्याच्या संदर्भात जास्त काळापर्यंत गोष्ट लपून राहत नाही. तसेच याही कारखान्याच्या संदर्भामध्ये झाले. अनुभवी तळीरामांना या दारूबद्दल शंका यायला लागली आणि मग त्यांच्या त्यांच्यामध्ये चर्चा होऊन ही स्वस्तात भेटणारी दारू निश्चितपणे बनावट आणि बोगस असली पाहिजे. असे सर्रास चर्चिले जाऊ लागले. यातूनच मग गुप्त बातमीदारांच्या मार्फत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कर्तबगार कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना या गोष्टीची माहिती लागली.
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यामध्ये असलेल्या मौजे बुट्टेनाथदरी येथील काठवण झाडीत असलेल्या गोडाऊनच्या शेडमध्ये एक बनावट देशी दारू बनवणारा कारखाना उभारला गेला होता, ही माहिती हाती लागताच राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक भरारी पथक क्रमांक दोन बीड, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क विभाग अंबाजोगाई, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क माजलगाव, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क बीड यांच्या पथकाने या कारखान्यावर छापा टाकून अचानकपणे प्रचंड साहित्य जप्त केले आहे.
यामध्ये प्रामुख्याने बनावट देशी दारू रॉकेट दारूच्या दहा हजार पाचशे बॉटल्स म्हणजेच 105 बॉक्स, ज्याची अंदाजे किंमत तीन लाख 67 हजार पाचशे रुपये तसेच एक जे एस एल जिंदाल स्टेनलेस कंपनीचे स्वयंचलित सिलिंग, फीलिंग, व बॉटलिंग मशीन अंदाजे किंमत एक लाख 50 हजार रुपये, तसेच 200 लिटर मापाचे स्पीरिटने भरलेले प्लास्टिक बॅरल अंदाजे किंमत 25000 रुपये, तसेच 90 मिली क्षमतेच्या एक लाख 800 प्लास्टिकच्या रिकाम्या बॉटल, किंमत अंदाजे 800 रुपये, देशी दारू रॉकेटचे 30000 बुचे, अंदाजे किंमत 30000 रुपये, देशी दारू रॉकेटचे आठ हजार लेबल अंदाजे किंमत 16000 रुपये, 2000 लिटर व पाच हजार लिटरचे एकूण तीन पाण्याचे बॅरल अंदाजे किंमत 9000 रुपये, पाण्याची मोटर दोन नग अंदाजे किंमत दहा हजार रुपये, प्रवरा प्रिंटचे 60 टेप रोल अंदाजे किंमत 3000, देशी दारू रॉकेट बॉक्स पुठ्ठे 1000 नग अंदाजे किंमत 2000 रुपये, पाच अल्कोहोल मीटर अंदाजे किंमत 2500 रुपये, विविध कंपनीचे चार भ्रमणध्वनी अंदाजे किंमत 75000 रुपये, एक किया कंपनीची सेल्स चार चाकी कार (जिचा नोंदणी क्रमांक एम एच 12 आर वाय 44 06) अंदाजे किंमत दहा लाख, एक अशोक लेलँड कंपनीचे आयशर टेम्पो (याचा नोंदणी क्रमांक एम एच 40 सीडी 34 21) अंदाजे किंमत रुपये सतरा लाख रुपये, दहा लिटर क्षमतेचे इसेन्सने भरलेले प्लास्टिक कॅन अंदाजे किंमत रुपये 7500, पाण्याचे प्लास्टिकचे पाईप पाच नग अंदाजे किंमत 2500 रुपये, एक आरो पाणी फिल्टर मशीन अंदाजे किंमत 50 हजार रुपये, असा एकूण 35 लाख 56 हजार 800 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी आरोपी आकाश गोवर्धन नेहरकर, दिलीप शांतीलाल पावरा, विकेश रघु ब्राह्मणे, जयम लालू पावरा, किरण दिलीप पावरा, ईश्वर भाया पावरा यांना अटक करण्यात आली असून पप्पू कदम व दिनेश गायकवाड हे फरार झाले आहेत. त्याचा शोध सुरू असून आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 च्या विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरील कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक विश्वजीत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक दोन चे निरीक्षक डी.डी. चौरे, राज्य उत्पादन शुल्क विभाग बीडचे निरीक्षक आर बी राठोड, राज्य उत्पादन शुल्क विभाग अंबाजोगाईचे दुय्यम निरीक्षक ठोकळ ,राज्य उत्पादन शुल्क अंबाजोगाई विभागाचे दुय्यम निरीक्षक ए एल कारभारी, राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रमांक दोन बीडचे दुय्यम निरीक्षक तसेच अर.बी. कदम सहाय्यक दुय्यम निरीक्षक व जवान एस व्हीं धस, आर ए जारवाल, बी के पाटील, आर एम गोणारे, के एन डुकरे, एस व्ही लोमटे, डी.एस. वायबट, ए पी कदम, श्रीमती एस एस ढवळे, आर.जी. मुंडे यांनी सदरील कार्यवाही यशस्वीरित्या पार पाडली. पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क विभाग भरारी पथक क्रमांक दोन चे निरीक्षक डी.डी. चौरे हे करत आहेत.