औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करावी – अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे
लातूर (एल.पी.उगीले) : भारत निवडणूक आयोगाने औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार जिल्ह्यात 29 डिसेंबरपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. सर्व शासकीय विभागांनी आदर्श आचारसंहितेचे प्रभावी अंमलबजावणी करून निवडणूक शांततेत व पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी समन्वयाने काम करावे, अशा सूचना अपर जिल्हाधिकारी तथा निवडणूक समन्वय अधिकारी डॉ. अरविंद लोखंडे यांनी आज येथे दिल्या,औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणुकीशी संबंधित जिल्हास्तरीय नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक अपर जिल्हाधिकारी लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झाली.
निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुचिता शिंदे, उपजिल्हाधिकारी जीवन देसाई, नितीन वाघमारे, जिल्हा पुरवठा अधिकारी सदाशिव पडदुणे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डी. एन. गिरी, एन. एस. दाताळ, डी. बी. गिरी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. लक्ष्मण देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे, जिल्हा कोषागार अधिकारी आर. एस. राऊत, जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त व लेखा अधिकारी ए. जी. चाटे यांच्यासह विविध शासकीय विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.
उमेदवारांनी प्रचारासाठी भारत निवडणूक आयोगाने विहित केलेल्या परवानग्या घेणे आवश्यक आहे. या परवानग्या देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात एक खिडकी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आदर्श आचारसंहितेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात व्हिडीओ सर्व्हिलन्स टीम, भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. या पथकांनी आचारसंहिता भंगाबाबत प्राप्त तक्रारींची दखल घेवून तत्काळ कार्यवाही करावी. आदर्श आचारसंहिताविषयक तक्रारी स्वीकारणे व मतदारांच्या मदतीसाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार असल्याचे डॉ. लोखंडे यांनी सांगितले. सर्व नोडल अधिकाऱ्यांनी आपल्यावर सोपविलेली जबाबदारी योग्यप्रकारे पार पाडावी. यामध्ये कोणतीही कुचराई झाल्यास संबंधित अधिकारी, कर्मचाऱ्यांविरुद्ध कार्यवाही करण्यात येणार आहे, असे ते यावेळी म्हणाले.
मतदान केंद्रांवर नियुक्त अधिकारी, कर्मचारी यांच्यासाठी 6 जानेवारी आणि 18 जानेवारी रोजी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येणार असून यासाठी सर्व संबंधितानी उपस्थित राहणे बंधनकारक आहे. जिल्ह्यात 40 मतदान केंद्र असून सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्यावर लक्ष राहणार असल्याचे डॉ. लोखंडे यावेळी म्हणाले. मतदारांसाठी मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यासाठी नोडल अधिकारी नियुक्त करण्यात आले असून त्यांनी सर्व मतदान केंद्रांचा आढावा घेवून आवश्यक उपाययोजना कराव्यात. मतदान प्रक्रीयेविषयी मतदारांमध्ये जागृती करण्यासाठी ‘स्वीप’अंतर्गत प्रयत्न करण्याच्या सूचनाही त्यांनी संबधित नोडल अधिकाऱ्यांना दिल्या.
जाहिरात प्रमाणीकरणासाठी समिती गठीत
औरंगाबाद विभाग शिक्षक मतदारसंघ निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी पॉम्प्लेट, पोस्टर, बॅनरसह मुद्रित, इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रचारासाठी वापरावयाचे प्रचार व्हिडीओ, ऑडीओ, बल्क मेसेज, जाहिरात मजकूर प्रसिद्धी पूर्वी प्रमाणित करून घेणे बंधनकारक आहे. यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यामुळे पूर्व प्रमाणीकरण झाल्याशिवाय जाहिरात, मजकूर प्रसिद्ध होणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचना अपर जिल्हाधिकारी डॉ. लोखंडे यांनी दिल्या.