शास्त्री शाळेत वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन व स्वयंशासन दिन साजरा
उदगीर (एल.पी.उगीले) :भारतीय शिक्षण प्रसारक संस्था, अंबाजोगाई संचलित लाल बहादूर शास्त्री प्राथ जयमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून,स्वयंशासन दिन व वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला.
वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्घाटनासाठी व्यासपीठावर अध्यक्ष म्हणून स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष मधुकर वट्टमवार तर,प्रमुख अतिथी म्हणून भा.शि.प्र. संस्थेचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य तथा स्थानिक समन्वय समितीचे कार्यवाह शंकरराव लासुणे, मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे,विभाग प्रमुख सुधाकर पोलावार व संमेलन प्रमुख श्रीमती नीता वट्टमवार उपस्थित होत्या.
मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत शंकरराव लासुणे यांनी कबड्डीच्या मैदानावर श्रीफळ फोडून वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन केले. संमेलन प्रमुख श्रीमती नीता वट्टमवार यांनी वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये घ्यावयाच्या विविध खेळांची व सांस्कृतिक कार्यक्रमांची माहिती सांगितली.
अध्यक्षीय समारोपपर भाषणात मधुकर वट्टमवार यांनी वार्षिक स्नेहसंमेलन विद्यार्थ्यांच्या खूप आवडीचा उपक्रम आहे. विद्यार्थ्यांनी विविध खेळांमध्ये व सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेऊन,आपल्या कलागुणांना वाव द्यावा व स्नेहसंमेलनाचा आनंद लुटावा,असे आवाहन केले.
वार्षिक स्नेहसंमेलनाच्या प्रास्ताविकात मुख्याध्यापक अंकुश मिरगुडे यांनी कोरोना लॉकडाऊनच्या दोन वर्षानंतर यावर्षी विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून,वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन केल्याचे सांगितले. सूत्रसंचलन श्याम गौंडगावे यांनी केले.
इयत्ता चौथी मधील एकूण ७२ विद्यार्थ्यांनी स्वयंशासन दिनामध्ये भाग घेतला होता.यामध्ये विद्यार्थी मुख्याध्यापक म्हणून चि.सिद्धांत नवनाथ मोरखंडे, उपमुख्याध्यापक म्हणून चि.समर संदेश कलमे,लिपिक चि.आदिराज प्रदीप तरगुडे तर,सेवक म्हणून सिद्धेश्वर कांबळे,करण सोळंके,यश पानढवळे,यश चव्हाण व सोहम् बुर्ले यांनी चोखपणे जबाबदारी पार पाडली. सर्व विद्यार्थी शिक्षक व शिक्षिकांनी नेमून दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे खूप छान प्रकारे अध्यापनाचे कार्य केले.
संपूर्ण स्वयंशासन दिनात सहभागी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन श्याम गौंडगावे व सौ. भाग्यश्री स्वामी यांनी केले. सकाळी ७.३० परिपाठापासून ते १२.३० पर्यंत एकूण ६ तासिकेमध्ये यशस्वीरित्या स्वयंशासन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
