बँकेच्या त्रासाला कंटाळून तरूण कर्मचाऱ्याची आत्महत्या
लातूर (एल.पी.उगीले) : लातूर शहरातील भाग्यलक्ष्मी महीला सहकारी बँकेच्या मानसिक त्रासाला कंटाळून तरूण कर्मचारी नितीन अशोकराव बालवाड यांनी आत्महत्या केली.

सन 2009 पासून नितीन बालवाड हे भाग्यलक्ष्मी महीला सहकारी बँकेत सेवक या पदावरती कार्यरत होते, पण मागील दोन महिन्यांपासून बँकेच्या इतर कर्मचाऱ्यांनी केलेल्या अंतर्गत गैरव्यवहार प्रकरणात कसलाही संबंध नसताना, विनाकारण नितीन बालवाड यांना दोषी ठरविण्यात येत होते. आणि तुझ्यामुळेच हा घोळ उघडा पडला आहे. आणि तुझ्या सांगण्यावरून आम्ही असे केले, हे आम्ही वरीष्ठांना कळवू व तुझी नौकरी घालवू. असे वारंवार धमकी देऊन टोचुन बोलायचे, त्यामुळे शांत स्वभाव असलेल्या नितीन यांच्यासमोर स्वत:ला निर्दोष आहे हे पटवून देण्यासाठी आत्महत्येशिवाय इतर कोणताच पर्याय ठेवला नाही.
नितीन बालवाड यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी भाऊ पांडुरंग अशोकराव बालवाड यांच्या फिर्यादीवरून भाग्यलक्ष्मी महीला सहकारी बँकेच्या परळीकर मॅडम,पोलावार ,किरण डोईजड,वैभव राहटणीकर आणि पारले या कर्मचाऱ्यांविरोधात भारतीय दंड संहिता 1860 अंतर्गत कलम 306 आणि 34 नुसार गुन्हा नोंद केला आहे. नितीन बालवाड यांच्या पश्चात पत्नी,दोन लहान मुली ,आईवडील असा परीवार आहे.पुढील तपास लातूर ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गणेश कदम व प्रतिभा प्रभाकर ठाकुर हे करीत आहेत.
