महिलांनी आत्मनिर्भर होऊन विविध क्षेत्रात दबदबा निर्माण करावा- डॉ. सतीश ससाणे

महिलांनी आत्मनिर्भर होऊन विविध क्षेत्रात दबदबा निर्माण करावा- डॉ. सतीश ससाणे

अहमदपूर ( गोविंद काळे) : महिलांचा मान, महिलांचा सन्मान तेव्हाच वाढेल जेव्हा महिला स्वावलंबी बनवून आपल्या नेतृत्वाने, वक्तृत्वाने यशाची शिखरे पादाक्रांत करतील यासाठी त्यांनी साहित्य, संशोधन, क्रीडा, राजकारण, शिक्षण आदी क्षेत्रांमध्ये आपला दबदबा निर्माण करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले महाविद्यालयातील समाजशास्त्र विभाग प्रमुख तथा राष्ट्रीय चर्चासत्राचे संयोजक डॉ. सतीश ससाने यांनी केले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे औचित्य साधून येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या समाजशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘ महिला सक्षमीकरण वास्तव आणि अपेक्षा ‘ या विषयावरील राष्ट्रीय चर्चासत्राचे प्रास्ताविक करताना डॉ. सतीश ससाणे बोलत होते.

दूरदृश्य तथा’ गुगल मीट’ च्या द्वारे ऑनलाईन संपन्न झालेल्या या राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन आंध्रप्रदेश वरंगल येथील सातवाहन विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. मोहम्मद अली इकबाल यांनी केले. या चर्चासत्रात विषयतज्ञ म्हणून हैदराबाद येथील डॉ. अनुपमा आळवाईकर , डॉ. मीनाक्षी नांदापूरकर तसेच पुणे येथील सामाजिक कार्यकर्त्या डॉ. माधवी कवी , औरंगाबाद येथील जेष्ठ कवयित्री तथा ललित लेखिका डॉ. ललिता गादगे, प्राचार्य डॉ . वसंत बिरादार पाटील आदींनी मार्गदर्शन केले तर उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी तथा आदर्श शिक्षिका माधवी चौकटे ह्या होत्या .

यावेळी आपल्या प्रास्ताविकात पुढे बोलताना डॉ. सतीश ससाणे म्हणाले की, प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते अंध विद्यार्थ्यांसाठी अंधारातून प्रकाशाकडे असो किंवा विधवा स्त्रियांचा सन्मानाचा कार्यक्रम असो असे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात असे ही ते म्हणाले .
या राष्ट्रीय चर्चासत्राचे सूत्रसंचालन हिंदी विभाग प्रमुख डॉ. नागराज मुळे यांनी केले; तर आभार प्रदर्शन इंग्रजी विभाग प्रमुख प्रा .आतिश आकडे यांनी केले. या चर्चासत्रात देशातील विविध अभ्यासकांनी ऑनलाइन सहभाग नोंदविला. मान्यवरांच्या हस्ते चर्चासत्रातील शोधनिबंधांच्या स्मरणिकेचेही प्रकाशन करण्यात आले.

About The Author