लोक वैभवाच्या मराठीची परंपरा थोरच – डॉ. अनिल मुंढे
अहमदपूर (गोविंद काळे) : मराठी भाषा ही महाराष्ट्राची आद्य प्राकृत भाषा असून, आपल्या साहित्यातून शोषितांच्या व्यथा प्रभावीपणे मांडणारी ही भाषा आज लोक वैभवाच्या शिखरावर विराजमान असून, इतिहास काळातही मराठीची परंपरा थोर आहे ‘ असे प्रतिपादन महात्मा फुले महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक तथा महाराष्ट्रातील ख्यातनाम कीर्तनकार ह. भ. प. डॉ. अनिल मुंढे यांनी केले.
नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या नांदेड विभागीय केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मराठी भाषा गौरव दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अनिल मुंढे हे बोलत होते. दूर दृश्य तथा झूम प्रणालीद्वारे आयोजित कार्यक्रमात ” मराठी भाषा : परंपरा व थोरवी ” या विषयावर डॉ. अनिल मुंढे यांनी व्याख्यान दिले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या नांदेड विभागीय केंद्राचे प्रमुख डॉ. बी. के. मोहन हे होते, तर सहाय्यक कुलसचिव चंद्रकांत पवार, यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना डॉ. अनिल मुंढे म्हणाले की, मध्ययुगीन काळात महानुभावांनी आणि वारकऱ्यांनी मराठी भाषेला धर्म भाषेचा दर्जा दिला. त्यापूर्वी कर्नाटकातील जैन तीर्थंकर भगवान बाहुबलीच्या मूर्तीखाली ” श्री चामुण्डराये करवियले, गंगराये सुत्ताले करियले” ही मराठी भाषेतील पहिली लिखित ओळ सापडते. हा मराठी भाषेचा गौरवशाली वारसा पुढे बखरकार आणि शाहिरांनी चालवून मराठीला वैभवाच्या शिखरावर विराजमान केले आहे. आज कुणी काही म्हणत असले तरी जो पर्यंत मराठी माणूस आहे, तोपर्यंत मराठीला मरण नाही, असेही त्यांनी सांगितले.
या ऑनलाइन आभासी कार्यक्रमात विविध महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक आणि शंभराच्या जवळपास मराठी रसिकांनी सहभाग घेतला.