थकीत पीकविम्यासाठी शिवसेनेचे शेतकरी आंदोलन
दोन दिवसात बैठक घेण्याचे प्रशासनाचे आश्वासन
लातूर (प्रतिनिधी) : लातूर व रेणापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा थकलेला पीकविमा तात्काळ द्यावा,या मागणीसाठी शिवसेनेच्या वतीने माजी उपजिल्हाप्रमुख सचिन दानेयांच्या नेतृत्वात शिवाजी चौक व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उग्र आंदोलन करण्यात आले.या आंदोलनाची दखल घेत दोन दिवसात बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिल्याची माहिती दाने यांनी दिली.
लातूरसह रेणापूर तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांनी पीकविम्याचा हप्ता भरला होता.विमा मंजूर होऊनही अद्याप तो शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेला नाही. यामुळे सचिन दाने यांच्या नेतृत्वात आंदोलन छेडण्यात आले.छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास अभिवादन करून कार्यकर्त्यांनी ‘जय भवानी,जय शिवाजी’च्या घोषणा दिल्या. हलगी वाजवून ठिय्या आंदोलन केले.पीकविमा कंपनी व प्रशासनाच्या विरोधातही घोषणाबाजी करण्यात आली. त्यानंतर आंदोलक जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचले.तेथेही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.आंदोलकांच्या तीव्र भावना लक्षात घेत अधिकाऱ्यांनी त्यांच्याजवळ येत निवेदनाचा स्वीकार केला.आगामी दोन दिवसात या संदर्भात बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.
शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी केल्या जाणाऱ्या आंदोलनाची ही सुरुवात आहे.शेतकऱ्यांच्या बाजूने निर्णय झाला नाही यापेक्षाही तीव्र आंदोलन केले जाईल,असा इशारा सचिन दाने यांनी यावेळी बोलताना दिला.या आंदोलनात दशरथ सोळुंके, बाबुराव मुसळे,नरसिंग सोमवंशी, मलकुअप्पा हलकंचे,गोपाळ पवार,विश्वनाथ जाधव,मंचक सरवदे,भगवान शिंदे,ज्ञानेश्वर पवार,विठ्ठल मुसळे,उत्तम झुंजारे, पाशाभाई शेख,परमेश्वर माने, पांडुरंग मुसळे,विकास पवार, मुबीन सय्यद,जलील शेख, कैलास पाटील,नितीन औसेकर, आकाश बोडके,कृष्णा साखरे,लहू मदने,चंदू शिंदे,आदित्य पाटील, लालासाहेब मोरे यांच्यासह मोटेगाव,भोकरंबा,कामखेडा, मोरवड,दवणगाव,फरदपूर, समसापूर,कारेपूर,गोविंदनगर, पळशी यासह लातूर व रेणापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
