“ग्रंथालय शाळेच्या दारी” हा उत्कृष्ट उपक्रम – प्राचार्य चोबळे

"ग्रंथालय शाळेच्या दारी" हा उत्कृष्ट उपक्रम - प्राचार्य चोबळे

उदगीर (एल. पी. उगीले) : विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करून वाचन संस्कृतीची जोपासना आणि विद्यार्थ्यांची जिज्ञासा वाढ, या उदात्ते हेतूने “ग्रंथालय शाळेच्या दारी” हा अत्यंत स्तुत्य उपक्रम लातूर जिल्ह्यामध्ये अत्यंत प्रभावीपणे राबवला जात आहे. याचा फायदा विद्यार्थ्यांना निश्चितपणे होईल. असा विश्वास श्यामलाल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य आनंद चोबळे यांनी व्यक्त केला.

ते श्यामलाल सार्वजनिक तालुका वाचनालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या “ग्रंथालय शाळेच्या दारी” या उपक्रमाच्या अंतर्गत विद्यार्थ्यांच्या सदस्य नोंदणी प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.

याप्रसंगी महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयाचे उप प्राचार्य चंद्रकांत भद्रे हे अध्यक्षस्थानी होते. या उपक्रमाच्या संदर्भात श्यामलाल सार्वजनिक तालुका वाचनालयाचे ग्रंथपाल तथा ग्रंथालय चळवळीचे नेते ग्रंथमित्र सूर्यकांत शिरसे यांनी प्रास्ताविक भाषण करून, विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लागावी, बालवाचक वाढावेत, “प्रत्येक वाचकाला पुस्तक आणि प्रत्येक पुस्तकाला वाचक मिळाला पाहिजे” हा हेतू ठेवून हा उपक्रम राबवला जात असल्याची माहिती सांगितली.

कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य चंद्रकांत भद्रे यांनी याप्रसंगी शाळेतील वीस बालवाचकांची सदस्य नोंदणी स्वखर्चाने करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. तसेच हाच आदर्श इतर ज्येष्ठ वाचकांनी आणि प्राध्यापक, शिक्षक वर्ग यांनी घेऊन वाचन संस्कृती विकासाचा महायज्ञ चालू ठेवावा. असे आवाहन केले.

पुढे बोलताना प्राचार्य आनंद चोबळे यांनी श्यामलाल सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने वेळोवेळी विविध उपक्रम घेऊन समाजाभिमुख राहण्याचा प्रयत्न केला आहे, नव्या नव्या पुस्तकांचा खजिना वाचकांसाठी उपलब्ध करून देत असताना अनेक वेळा पुस्तक प्रदर्शनाचेही कार्यक्रम वाचनालयाने घेतले असल्याचे सांगितले. याप्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शामलाल माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे पर्यवेक्षक राहुल लिमये यांनी केले. तर आभार प्रदर्शन शामलाल सार्वजनिक वाचनालयाच्या सहाय्यक ग्रंथपाल रेखा लाला यांनी केले. ग्रंथालयाच्या या पुस्तक प्रदर्शनाचा आणि सदस्य नोंदणीचा लाभ श्यामलाल विद्यालयाच्या बालवाचकांनी मोठ्या उत्साहात घेतला.

About The Author

error: Content is protected !!