सरपंच हा गावच्या विकासाचा केंद्रबिंदू असतो – दिलीप देशमुख (मालक)

सरपंच हा गावच्या विकासाचा केंद्रबिंदू असतो - दिलीप देशमुख (मालक)

चाकूर (एल. पी. उगीले) : कोणत्याही गावचा विकास व्हायचा असेल तर त्या गावचा सरपंच हा सक्षम असला पाहिजे. कारण पंचायत राजच्या धोरणानुसार सरपंच हा गावच्या विकासाचा कणा आहे. गावाचा विकास काय असतो? हे जसे हिवरे बाजार ग्रामपंचायतिने उभ्या महाराष्ट्राला दाखवून दिले, तसा विकास आपल्या गावातही झाला पाहिजे. अशी तळमळ आणि विकासाची दूरदृष्टी घेऊन विकास कामे करा. सरकार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. असे विचार भारतीय जनता पार्टीचे नेते तथा भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख उर्फ मालक यांनी मांडले.

ते चाकूर तालुक्यातील अंबुलगा येथील नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांना सत्कार करून मार्गदर्शन करताना बोलत होते. पुढे बोलताना दिलीपराव देशमुख उर्फ मालक यांनी स्पष्ट केले की, सरपंचांनी गावच्या विकासाचा आराखडा तयार करून त्यादृष्टीने नियोजन करावे. आपण सदैव त्यांच्या पाठीशी आहोत. प्रत्येक गावातील शेतकरी, कष्टकरी, सर्वसामान्य माणूस हा केंद्रबिंदू समजून सरपंचांनी काम करावे.

शासनाच्या वतीने लोककल्याणकारी अनेक योजना राबवल्या जात आहेत. त्या योजना लाभार्थ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी एक माध्यम म्हणून ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी काम केल्यास गावचा चेहरा मोहरा बदलायला वेळ लागणार नाही. खऱ्या लाभार्थ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ झाल्यास ते देखील आपण केलेले कार्य कायम स्मरणात ठेवून आपल्या नेतृत्वाबद्दल आदर ठेवून राहतील. याची जाणीव सर्वांनी ठेवावी. असेही आवाहन याप्रसंगी दिलीपराव देशमुख मालक यांनी केले.

चाकूर तालुक्यातील अंबुलगा येथील नवनिर्वाचित सरपंच तेलंगे विद्याबाई बाबुराव तसेच उपसरपंच गोविंद काशिनाथ जाधव ग्रामपंचायत सदस्य यांचाही सत्कार करून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी अंकुश नरसिंग शिंदे, पांडुरंग जाधव, लिंबराज गरड, अरविंद जाधव, गावातील ग्रामस्थ आबासाहेब गरड, गजेंद्र गरड, पद्माकर जाधव, दत्ता गरड, बब्रुवान सूर्यवंशी, शशिकांत गरड, अंगद जाधव, राजेभाऊ जाधव, बाबुराव तेलंगे, नारायण मायकर, तुषार जाधव, नारायण जाधव, बालाजी पाटील यांच्यासह अनेक प्रतिष्ठित नागरिक याप्रसंगी उपस्थित होते.

पुढे बोलताना दिलीपराव देशमुख मालक म्हणाले की, महाराष्ट्रात आणि केंद्रातही भारतीय जनता पार्टीचे सरकार असल्यामुळे विकासात्मक दृष्टिकोन ठेवून शासन जनतेचे भले व्हावे, या विचाराने काम करत आहे. त्या कामाला गाव पातळीवरील नागरिकांनी आणि स्थानिक लोकप्रतिनिधींनी साथ देऊन, “एकमेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ” या सहकारातील विचाराप्रमाणे सर्वांनी एक दुसऱ्याला सहकार्य करून गावचा विकास करावा. म्हणजेच पर्यायाने देशाचा विकास होईल. कारण गावचा विकास म्हणजेच राज्याचा आणि देशाचा विकास आहे.

देश म्हणजे देशातील माणसे, ही भावना ठेवून भारतीय जनता पक्ष कार्य करत आहे. येणाऱ्या काळातही जनतेने भारतीय जनता पार्टी सोबत राहून विकास कामे करून घ्यावीत, असेही त्यांनी सांगितले.

About The Author

error: Content is protected !!