दिनेश जावळे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाभर युवा सेनेच्या बैठका उत्साहात संपन्न
लातूर (एल.पी. उगीले) : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) या पक्षाच्या युवा आघाडीच्या वतीने युवासेनेने जिल्हाप्रमुख दिनेश जावळे यांच्या नेतृत्वाखाली ठिकठिकाणी बैठका घेऊन युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्या प्रयत्नांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो आहे. औसा, निलंगा, शिरूर आनंतपाळ या तालुक्यातील बैठका उत्स्फूर्तपणे संपन्न झाल्या.
युवासेना प्रमुख माजी मंत्री आदित्य ठाकरे व युवासेना सचिव वरून सरदेसाई यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत युवकांनी मोठ्या प्रमाणात युवासेनेत काम करणे पसंत केले आहे. त्यामुळेच तरुणांचा युवासेनेत प्रवेशही वाढला आहे. युवासेनेचे जिल्हाप्रमुख दिनेश जावळे यांनी औसा, निलंगा, शिरूर आनंतपाळ, देवनी या तालुक्याच्या ठिकाणी आणि परिसरात जाऊन बैठका घेऊन मार्गदर्शन केले.
पूर्वी औसा विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. मात्र भारतीय जनता पक्षासोबत युती झाल्यानंतर हा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाला सोडण्यात आला, आणि त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा आमदार झाला. आणि भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला धोका दिल्यामुळे आज शिवसैनिकांच्या मनामध्ये खदखद निर्माण झाली असून, औसा तालुक्यामध्ये पुन्हा शिवसेनेची ताकद वाढवण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे लक्षात आल्यामुळे युवा आघाडीने पुढाकार घेतला आहे. पुन्हा हा मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात येईल, युवकांनी ते करूनही दाखवावे. औसा आणि निलंगा मतदारसंघ हे निश्चितपणे शिवसेनेच्या बळावर युवा आघाडीने प्रयत्न केल्यास जिंकता येऊ शकतील. असा विश्वास बाळगून प्रत्येक गावात शाखा काडून पुन्हा आपण शून्यातून तयारी करतो त्या प्रमाणे तयारी ठेवून, जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम युवासैनिकांनी करावे. आणि आक्रमकपणे सामाजिक प्रश्न मांडावेत. जनतेच्या प्रश्नांसोबत राहून त्याची सोडवणूक करण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत. लोक शिवसेनेवर प्रचंड प्रेम करतात. या गोष्टीची जाण ठेवून लोकांचे हित डोळ्यासमोर ठेवून आपण काम करावे. असेही आवाहन युवासेना जिल्हाप्रमुख दिनेश जावळे यांनी केले आहे. युवा आघाडीची वाढती ताकद पाहून निश्चितपणे राजकीय समीकरणे भविष्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात दिसून येतील. अशी चर्चा जिल्हाभर चालू आहे.
