बिदर जिल्ह्यातील फलोत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडवणार – अंकुशराव वाडीकर
कमालनगर (एल. पी. उगिले) : बिदर जिल्ह्यातील फळबागायत करणाऱ्या शेतकऱ्यांचे वेगवेगळे अनेक प्रश्न आहेत. वातावरणात होत असलेले सततचे बदल हे फल उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक समस्या बनत असून, यावर उपाययोजना करण्यासाठी शासकीय पातळीवरून विशेष प्रयत्न व्हावेत. यासाठी कमालनगर शेतकरी उत्पादक कंपनीचे संचालक अंकुशराव वाडीकर यांनी बिदर जिल्हा फलोत्पादन अधिकारी यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या समस्यांच्या विषयी सविस्तर चर्चा केली.
ग्रामीण भागातील सर्कल फलोत्पादन अधिकारी हे शासकीय योजनांची योग्य पद्धतीने माहिती देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात कमी पडत आहेत का? याचे अवलोकन करण्याच्या अनुषंगाने अनेक प्रश्न मांडले. तसेच शासनाच्या योजना चांगल्या प्रमाणे राबवल्यास, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना निश्चितपणे याचा फायदा होऊ शकतो. शेतकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या अनेक योजना शासनाच्या स्तरावर घोषित करण्यात आले आहेत. मात्र त्या प्रत्यक्ष मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन होणे गरजेचे आहे. कृषी कार्यालयामार्फत शेतकऱ्यांना सहकार्य मिळावे. असेही अंकुशराव वाडीकर यांनी सांगितले.

या समस्या ऐकल्यानंतर बिदर जिल्हा फलोत्पादक अधिकारी विश्वनाथराव जिरगाळे यांनी तालुक्यातील शेतकऱ्यासंबंधी वेगवेगळ्या उपाययोजनांची माहिती शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कृषी अधिकाऱ्यांना सांगितले जाईल, असे आश्वासन दिले. या महिने अखेर कमालनगर व दापका परिसर आणि गंगनबीड येथे काही शेतकऱ्यांची भेट घेऊन प्रत्यक्ष त्यांच्या अडचणी जाणून घेण्याचे आश्वासनही दिले. यावेळी बिदर तालुका फलोत्पादन अधिकारी आनंद कुलकर्णी यांनी देखील चर्चेमध्ये सहभाग नोंदवून अंकुशराव वाडीकर यांची शेतकऱ्यांच्या प्रश्नांच्या संदर्भात असलेली तळमळ अधिकाऱ्यांना निदर्शनास आणून दिली.
तसेच कित्येक शेतकरी शासकीय योजना माहित नसल्यामुळे किंवा आपले प्रश्न कसे सोडवावेत? हे माहिती नसल्यामुळे आपापल्या परीने उत्पादन वाढवण्यासाठी प्रयत्न करतात. मात्र दुर्दैवाने काही वेळेस ते प्रयत्न अपुरे पडतात. कोणत्या सीजनमध्ये कोणते पीक घ्यावे? त्याला कोणता खत द्यावा? किती प्रमाणात द्यावा? त्यासाठी आवश्यक असलेल्या शासकीय योजना काय? पाणीपुरवठ्यासाठीच्या योजना तसेच शेतकऱ्यांना शेतामध्ये शेड निर्माण करण्यासाठी, मल्चिंग करण्यासाठी व्यवस्था काय आहे? याही अनुषंगाने मार्गदर्शन होणे आवश्यक आहे. अशा विविध विषयांचे विश्लेषण आणि प्रश्नांची मांडणी अंकुशराव वाडीकर यांनी अधिकाऱ्यासमोर मांडल्यानंतर या सर्व प्रश्नांना विचारात घेऊन तात्काळ ते सोडवण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन फलोत्पादक अधिकाऱ्यांनी दिले आहे.
