पोलिसांच्या निष्क्रियपणामुळे उदगीरची सिग्नल यंत्रणा ठरली कुचकामी !

पोलिसांच्या निष्क्रियपणामुळे उदगीरची सिग्नल यंत्रणा ठरली कुचकामी !

असून अडचण आणि नसून खोळंबा

उदगीर (प्रतिनिधी) : ग्रामीण भागात ‘ नाचायला येईना तिला अंगण वाकड ‘ अशी एक म्हण प्रचलित आहे. याच म्हणीप्रमाणे उदगीर शहरात वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी उभारलेल्या सिग्नल यंत्रणेची झालेली आहे. निष्क्रिय व सुस्त पोलीस प्रशासनामुळे उदगीरची सिग्नल यंत्रणा ‘ असून अडचण आणि नसून खोळंबा ‘ अशीच गत झालीया वाहतुकीच्या कोंडीत जीव गुदमरलेल्या उदगीरकरांची.

पोलिसांच्या निष्क्रियपणामुळे उदगीरची सिग्नल यंत्रणा ठरली कुचकामी !

उदगीर शहरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी नगरपालिका व पोलीस प्रशासनाने उपाययोजना कराव्यात अशी उदगीरकरांची जुनी मागणी आहे. सततच्या वाहतूक कोंडीमुळे सर्वसामान्य नागरिकांचा जीव गुदमरत चाललेला आहे. परिणामी येथील बेशिस्त वाहतुकीमुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागलेले आहेत. परंतु झोपेचे सोंग घेतलेल्या सुस्त व निष्क्रिय पोलीस प्रशासनाचे याकडे सदैव दुर्लक्ष राहिलेले आहे. केवळ वाहतूक नियमांच्या आणि तत्त्वज्ञानाच्या गप्पा मारून वाहतूक सुरळीत करण्याच्या बढाया उदगीरकरांना आता कंटाळवाण्या झाल्या आहेत. गेल्या दीड दोन वर्षांमध्ये उदगीर शहरातील बेशिस्त वाहतुकीने कळस गाठला आहे. पूर्वी गल्लीबोळातून सुरू असणारी अवैध प्रवासी वाहतूक आता चक्क छत्रपती शिवाजी महाराज चौकातूनच सुरू आहे. विनापरवाना ऑटो रिक्षाची वाढलेली संख्या , भर रस्त्यावर वेडी वाकडी दिवसभर उभे राहणारी वाहने , रस्त्यावरील दुकानदारांचे अतिक्रमण , पथविक्रेते , हातगाडे , भाजीपाला विक्रेते यामुळे वाहनधारकांना व नागरिकांना रस्त्यावरून चालणे कठीण झालेले आहे. वयोवृद्ध नागरिक , महिला , लहान बालके यांना रस्त्यावरून मार्गक्रमण करताना जीव मुठीत घेऊन तारेवरची कसरत करावी लागते. परंतु निष्क्रिय व सुस्त प्रशासनाकडून केवळ बघ्याची भूमिका घेतली जाते. वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी , रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यासाठी कुठलाही कर्तबगार व बहाद्दर अधिकारी व कर्मचारी आपले कर्तव्य पार पाडताना दिसून येत नाहीत. केवळ ‘ ड्युटी ‘ पुरतेच कर्तव्य पार पडताना दिसून येतात.

उदगीर शहरातील बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी शहरातील चौका-चौकात सिग्नल यंत्रणा उभारण्यात यावी अशी मागणी मागच्या काही वर्षापासून सुरू होती. उदगीर नगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक , डॉ. झाकीर हुसेन चौक , कॅप्टन कृष्णकांत कुलकर्णी चौक आणि शहर पोलीस ठाणे समोर अशा चार ठिकाणी सिग्नल यंत्रणा सहा-सात महिन्यांपूर्वी उभारण्यात आली. दिनांक ४ जून २०२२ रोजी आमदार संजय बनसोडे यांच्या हस्ते मोठ्या जल्लोषात सिग्नल यंत्रणेचा शुभारंभ करण्यात आला. महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरील ऐतिहासिक उदगीर शहरात सिग्नल यंत्रणा सुरू झाल्याने येथील वाहतुकीची कोंडी सुटून नागरिकांना रस्त्यावरून सुरक्षित मार्गक्रमण करता येईल अशी अपेक्षा होती. महिनाभरातच मुख्य रस्त्याचे काम सुरू झाल्याने सिग्नल यंत्रणा बंद करण्यात आली. रस्त्याचे काम पूर्ण होऊन चार महिन्यांचा कालावधी लोटला परंतु अद्यापही सिग्नल यंत्रणा सुरू झालेली नाही. सिग्नल यंत्रणा बंद असल्याच्या अनेक वर्तमानपत्रांनी बातम्या प्रकाशित केल्या. मात्र झोपेचे सोंग घेतलेल्या सुस्त प्रशासनाने सिग्नल यंत्रणेचा डबा उघडून अद्याप पर्यंत बटन चालू केलेला नाही. सिग्नल यंत्रणा उभारूनही केवळ प्रशासनाच्या निष्क्रियपणामुळे कुचकामी ठरलेली आहे. परिणामी रस्त्यावरील वारंवार होणारी वाहतुकीची कोंडी यामुळे सर्वसामान्य नागरिकांचा जीव गुदमरत चाललेला आहे. परंतु उभारण्यात आलेली सिग्नल यंत्रणा सुरू करून वाहतुकीची कोंडी सुरळीत करावी यासाठी प्रशासनातील कुठलाही वरिष्ठ अधिकारी , लोकप्रतिनिधी , राजकीय पुढारी यांचे याकडे दुर्लक्षच झालेले आहे. जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षकांनी उदगीरच्या बेशिस्त वाहतुकीकडे लक्ष देऊन उपाययोजना कराव्यात आणि सर्वसामान्य नागरिकांना होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या यातना , त्रास यातून मुक्त करून दिलासा द्यावा अशी मागणी नागरिकांत होत आहे.

About The Author

error: Content is protected !!