उत्तम आरोग्यासाठी तंत्रज्ञान युक्त अत्याधुनिक सुविधांची गरज – आ. संजय बनसोडे
उदगीर (एल. पी. उगीले) : सुखी आणि समृद्ध जीवन जगण्यासाठी निरोगी शरीर अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी विशेषतः प्रौढ आणि वयस्कर नागरिकांना आरोग्यासाठी योग्य आहार, विहार आणि व्यायामाची गरज असते. यदा कदाचित शरीरामध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यास योग्य वेळी त्याचे निदान होणे देखील गरजेचे असते. त्यासाठी तज्ञ डॉक्टरांकडे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त साधनसामग्री असणे देखील गरजेचे आहे. सुदैवाने उदगीर विधानसभा मतदारसंघात अशा सुविधा आता वाढीस लागल्या आहेत. असे विचार माजी गृहराज्यमंत्री तथा उदगीर विधानसभा मतदारसंघाचे आ. संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.
ते उदगीर शहरातील देगलूर रोड जवळ असलेल्या विकास नगर येथील डॉक्टर बालाजी किशनराव शेळके यांच्या सप्तगिरी सोनोग्राफी आणि एक्स-रे सेंटरच्या भेटीच्या दरम्यान बोलत होते. याप्रसंगी त्यांच्या समवेत माजी आ. गोविंदअण्णा केंद्रे, सहकार महर्षी चंदरअण्णा वैजापूरे, राष्ट्रवादी काँग्रेस उदगीर विधानसभा अध्यक्ष प्रवीण भोळे, शहराध्यक्ष शेख समीर, पंचायत समितीचे माजी उपसभापती बाळासाहेब मारलापल्ले, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा दावणगावचे सरपंच ज्ञानेश्वर पाटील, शेकापूरचे विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब नवाडे, चंदरअण्णा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीकांत पाटील, राजकुमार बिरादार, डॉक्टर आचवले, यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना आ. संजय बनसोडे यांनी सांगितले की, आज तंत्रज्ञान खूप विकसित झाले आहे. त्याचे समाजाला भरपूर फायदे आहेत, तसेच काही तोटे देखील आहेत. या सर्व गोष्टीचा विचार करून जे समाजासाठी भले आहे, त्याची जाण ठेवत तज्ञ डॉक्टर मंडळी या तंत्रज्ञान आणि आधुनिक यंत्रसामग्रीचा उपयोग करतील असा मला विश्वास आहे. असे सांगून सप्तगिरी सोनोग्राफी आणि एक्स-रे सेंटरच्या आणि डॉक्टर बालाजी किशनराव शेळके यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
