उदगीरात खुल्लम खुल्ला चालतोय मटका! एलसीबीने शहर पोलिसांना दिला झटका!!!
उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर शहरात आणि परिसरात मटका जुगार मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यासंदर्भात वेळोवेळी, वेगवेगळ्या प्रसिद्धी माध्यमातून ओरड होऊ लागल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने उदगीर शहरातील बस स्थानकाच्या समोर देशमुख कॉम्प्लेक्स मध्ये चालू असलेल्या मटका अड्ड्यावर धाड टाकून स्वतःच्या फायद्यासाठी कल्याण नावाचा मटका जुगार खेळला व खेळविला जात असताना आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. कल्याण, मुंबई, मिलन डे नाईट, श्रीदेवी अशा वेगवेगळ्या मटक्याचे प्रकार मोठ्या जोमाने आणि राजरोसपणे शहरात चाललेले असताना देखील स्थानिक पोलीस या बाबीकडे का डोळे झाक करत आहे? हा मोठा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलेला आहे.

एका बाजूला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा संपूर्ण जिल्ह्याभरातून अवैध धंद्याला मुठ माती देण्यासाठी जीवाचे रान करत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजय देवरे हे या अवैध धंद्याच्या विरोधामध्ये पोलीस प्रशासनाने कठोर भूमिका घ्यावी, असे वारंवार सांगत असताना देखील मटका चालकांना कोणाचे पाठबळ मिळत आहे? हा संशोधनाचा विषय आहे. यापूर्वीच्या जिल्हा पोलीस प्रमुखांनी कठोर कारवाई करायचे प्रयत्न केले होते. इतकेच नाही तर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंद्यावर धाड टाकून गुन्हे दाखल केले, तर संबंधित पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकाऱ्याला जाब विचारला जात होता. इतकेच नाही तर त्यांच्यावर कारवाई देखील केली जात होती. मात्र सध्या तसा प्रकार नसल्याने स्थानिक पोलिसांना वरिष्ठांची भीती राहिलेली नाही. असे म्हटले तर वावगे होणार नाही.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातील विशेष पथकाने उदगीर शहर पोलीस स्टेशन हद्दीतील बस स्थानकासमोरील देशमुख कॉम्प्लेक्स मध्ये मोबाईल द्वारे कल्याण नावाचा मटका खेळत व खेळवीत असताना आरोपी शिवाजी रामचंद्र वाघमारे (वय 52 वर्ष, रा. एणकी – मानकी रोड, उदगीर) यास ताब्यात घेऊन त्याच्या जवळून जुगाराचे साहित्य व रोख रक्कम अकराशे वीस व एक रेडमी कंपनीचा काळा रंगाचा मोबाईल अंदाजे किंमत दहा हजार रुपये आणि एक सॅमसंग कंपनीचा मोबाईल अंदाजे किंमत सात हजार रुपये असा एकूण अठरा हजार एकशे वीस रुपयांचा एवज पोलिसांनी जप्त केला. याप्रकरणी उदगीर शहर पोलीस स्टेशन येथे संबंधित आरोपीच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 15/ 23, मुंबई जुगार कायदा कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस हेडकॉन्स्टेबल पुठ्ठेवाड हे अधिक तपास करत आहेत.
महाराष्ट्र, कर्नाटका, आंध्रा, तेलंगणा या चार राज्याच्या सीमेवर असलेल्या उदगीर शहरात आणि आजूबाजूच्या उपनगरात मटका आणि जुगार चांगलेच बळावत असून या अवैध धंदे चालवणाऱ्यांना स्थानिक पोलिसांचे आशीर्वाद आहेत की काय? असाही प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. अवैध धंद्यावर धाडी टाकण्यासाठी लातूर येथून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक किंवा जिल्हा पोलीस अधीक्षकांचे विशेष पथक उदगीरला येते, उदगीर येथील अवैध धंद्याला आळा घालण्यासाठी धाड टाकते! आणि हे प्रकार रोखण्याचा प्रयत्न करते, मग स्थानिक पोलीस करतात तरी काय? असा प्रश्न पुन्हा शिल्लक राहतोच.
प्रत्येक पोलीस स्टेशनला गुन्हे प्रगटीकरण शाखा म्हणून चार-पाच कर्तबगार समजले जाणारे कर्मचारी कार्यरत असतात. त्यांच्याकडून गुन्ह्यांचा शोध आणि गुन्हे होऊ नये त्यासाठी प्रयत्न होणे अपेक्षित असते. मात्र हे सोडून ते वेगळेच काहीतरी करतात की काय? असे वाटू लागले आहे. उदगीर शहर पोलीस स्टेशन येथे प्रभारी म्हणून सुधीर सूर्यवंशी सहाय्यक पोलीस निरीक्षक हे असताना, त्यांनी तब्बल दोन महिने या गुन्हे प्रगतीकरण शाखेला बरखास्त करून इतर कर्मचाऱ्यांसारखीच वागणूक दिली असता, त्यांच्याकडून जास्त काम झाल्याचे निदर्शनास आले होते. गुन्हे प्रगटीकरण्याच्या नावाने कार्यरत असलेली विशेष शाखा मग काय करत आहे? हा संशोधनाचा विषय बनतो आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक खूप कर्तबगार आहेत. त्यांनी या संदर्भात लक्ष घालावे आणि उदगीर शहरातील अवैध धंद्यांना आळा घालावा. अशी नागरिकांची मागणी आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाला अनावश्यक जिल्हाभर फिरण्याची वेळ येणार नाही, अशा पद्धतीचे कार्य स्थानिक पोलिसांनी करणे अपेक्षित आहे. मात्र दुर्दैवाने उदगीर मध्ये तसे होताना दिसून येत नसल्याची ही चर्चा आहे.
