ग्राम पंचायत निवडणूक खर्च दाखल करण्याचे आवाहन

ग्राम पंचायत निवडणूक खर्च दाखल करण्याचे आवाहन

उदगीर (एल. पी. उगिले) : उदगीर तालूक्‍यातील 26 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी दिनांक 18 डिसेंबर,2022 रोजी मतदान पार पडले आहे. या निवडणुकीचा निकाल 20 डिसेंबर रोजी जाहीर झाला आहे. या निवडणुकीमध्ये निवडणूक लढविणाऱ्या व बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांनी त्यांचा निवडणुकीच्या संपूर्ण खर्चाचा हिशेाब 19 जानेवारी 2023 पर्यंत तहसील कार्यालयातील खर्च पथक प्रमुख (उपकोषागार अधिकारी उपकोषागार कार्यालय उदगीर, शिवाजी चौक उदगीर, जुन्‍या तहसीलच्‍या मागे) यांचेकडे विहित नमुन्‍यात जमा करणे आवश्यक आहे.

मा.राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार उमेदवाराने निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर खर्चाचा एकूण तपशील 30 दिवसांच्या आत तालुकास्तरावरील संबंधीत प्राधिकृत खर्च पथकास विहित रितीने सादर करणे आवश्यक आहे. जर उमेदवाराने मा. राज्य निवडणूक आयोगाने विहित “वेळ व रित” प्रमाणे खर्चाचा तपशील सादरच केला नसेल किंवा उमेदवाराचा एकूण खर्च मर्यादेपेक्षा जास्त असेल किंवा “वेळ व रित यांचे पालन झाले नसेल, तर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचे कलम 14 (ब) नुसार संबंधीत उमेदवारास पाच वर्षासाठी अनर्ह करण्याबाबतची तरतूद आहे. त्यामुळे डिसेंबर 2022 मध्ये झालेल्या ग्रामपंचायतची सार्वत्रिक निवडणूक लढविणारे व त्याचप्रमाणे बिनविरोध निवडून आलेले उमेदवारांनी त्यांच्या निवडणुकीच्या एकूण खर्चाचा हिशोब तहसिल कार्यालय उदगीर या कार्यालयाने प्राधिकृत केलेल्या उपकोषागार अधिकारी उपकोषागार कार्यालय उदगीर येथील खर्च पथकाकडे दिनांक 19 जानेवारी 2023 पर्यत विहित रितीने सादर करावा, असे आवाहन करण्यात येत आहे, असे परिपत्रक उदगीर तहसीलच्या वतीने काढण्यात आले आहे.

About The Author