महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थी सत्कार संपन्न
उदगीर (एल.पी.उगीले) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थी सत्कार व विद्यार्थी कल्याण मंडळाचे उद्घाटन नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ विद्यार्थी कल्याण विभाग संचालक डॉ.सूर्यप्रकाश जाधव यांच्या हस्ते व संस्थेचे अध्यक्ष मल्लिकार्जुन मानकरी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. यावेळी मंचावर उपाध्यक्ष ॲड.प्रकाश तोंडारे, सचिव रामचंद्र तिरुके, सहसचिव डॉ.रामप्रसाद लखोटिया, सदस्य प्रा.मनोहर पटवारी, प्रशांत पेन्सलवार, प्रभारी प्राचार्य डॉ.बी.एम.संदीकर, उपप्राचार्य डॉ.आर.के.मस्के, उपप्राचार्य सी.एम.भद्रे, विद्यार्थी प्रतिनिधी फुलराणी कांबळे, प्रा.डॉ.वैजनाथ अनमुलवाड, विद्यापीठ भाषा वाङ्मय संस्कृति अभ्यास संकुल तसेच चंद्रशेखर चवंडा, यांची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कल्याण मंडळाचे उद्घाटन झाले. सर्वप्रथम दिव्यांग विद्यार्थ्यांना लेखनिक म्हणून सहाय्य करणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी विद्यापीठ गुणवत्ता यादीत सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थी ,नीट व जे.ई.ई.परीक्षेतील सर्वाधिक गुण प्राप्त करणारे आणि विषयात महाविद्यालयात गुणानुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांचा रोख पारितोषिके, स्मृतीचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी बोलताना तिरूके म्हणाले, महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय गुणवत्तेची खाण आहे. त्याचीच परिणती हा सोहळा आहे. कल्याण मंडळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रश्न सुटावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी डॉ.जाधव म्हणाले, महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय समृद्ध परंपरेचे असून, गुणवंतानी आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजहितासाठी करावा. गुणवंताचा होणारा सत्कार इतरांसाठी प्रेरणादायक असून कल्याण मंडळाच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्वाचा विकास आणि क्षमताचा वापर करण्याची संधी उपलब्ध होते. विद्यार्थ्यांनी आपले चारित्र्य जपत ध्येय साध्य करण्यासाठी सर्व शक्तीनिशी प्रयत्न करावेत. अध्यक्षीय समारोपात मानकरी म्हणाले, महाविद्यालयातील प्राध्यापक, संस्थाचालक, पालक, विद्यार्थी यांच्या एकत्रित प्रयत्नामुळे येथील गुणवत्ता निर्माण झाली आहे. प्रास्ताविकात डॉ.संदीकर यांनी सांगितले की, कल्याण मंडळाच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जाणार आहेत. सूत्रसंचालन प्रा.डॉ.अर्चना मोरे यांनी केले तर आभार प्रा.डॉ.मल्लेश झुंगा स्वामी यांनी मानले.