१०१ महाविद्यालयीन तरुणींना मोफत हेल्मेट वाटप,रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त माझं लातूर परिवाराचा अनोखा उपक्रम
लातूर (एल.पी.उगीले) : विद्यार्थ्यांना हेल्मेट वापराची सवय लागावी, दुचाकी वरील प्रवाशांना दुर्दैवाने अपघात झाला तरीही, तो गंभीर ठरू नये किंवा त्यांचा जीव वाचावा. या उदात्त हेतूने, “माझं लातूर परिवार” आणि “प्रादेशिक परिवहन विभागाच्या” संयुक्त विद्यमाने दयानंद विज्ञान महाविद्यालयातील १०१ युवतींना मोफत हेल्मेटचे वाटप करून रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात आला.
दयानंद विज्ञान महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोये यांची तर सहायक अधिकारी आशुतोष बारकुल, प्राचार्य डॉ. जयप्रकाश दरगड, उपप्राचार्य डॉ. मिलिंद माने, शहर वाहतूक पोलिस निरिक्षक सुनिल बिर्ला, उपनिरीक्षक आवेज काझी, मोटार वाहन निरीक्षक शितल गोसावी, सविता पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय भोये यांनी उपस्थित विद्यार्थिनींना रस्ता सुरक्षा विषयक नियम पाळण्याचे आवाहन करून मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. जयप्रकाश दरगड यांनी माझं लातूर परिवाराच्या उपक्रमाचे कौतुक केले. शहर वाहतूक पोलिस निरिक्षक सुनिल बिर्ला, उपनिरीक्षक आवेज काझी यांनीही वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन केले.
मान्यवरांच्या हस्ते १०१ तरुणींना हेल्मेट वितरीत करण्यात आले. यानंतर रस्ता सुरक्षा नियम पाळण्याची शपथ सभागृहात उपस्थित सर्वांना देण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोटार वाहन निरीक्षक सविता पवार यांनी केले, तर आभार जुगलकिशोर तोष्णीवाल यांनी मानले.उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी माझं लातूर परिवाराचे सतीश तांदळे, अभय मिरजकर, संजय स्वामी, प्रमोद गुडे, काशिनाथ बळवंते, राहुल मातोळकर, रत्नाकर निलंगेकर, नितीन बनसोडे, युवराज कांबळे, दत्तात्रय परळकर, सोमनाथ मेदगे, बालाजी सुर्यवंशी, श्रीराम जाधव, मनोज आखाडे यांनी परिश्रम घेतले.