नाथ शिक्षण संस्था आयोजित स्व.पंडित आण्णा मुंडे क्रिडा महोत्सव लवकरच जिल्हा स्तरावर जाईल-प्रा.प्रविण फुटके
परळी वैजनाथ ( गोविंद काळे) : नाथ शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला स्वर्गीय पंडित (आण्णा) मुंडे क्रिडा महोत्सव लवकरच जिल्हा स्तरावर जाईल असे प्रतिपादन प्रा. प्रविण फुटके यांनी स्वर्गीय पंडित आण्णा मुंडे क्रिडा महोत्सवाच्या शारदाबाई गुरुलिंगआप्पा मेनकुदळे शाळेत उद्घाटनप्रसंगी बोलताना सांगितले. नाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माजी सामाजिक न्याय मंत्री तथा परळी विधानसभा मतदारसंघाचे आ. धनंजय मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहसचिव प्रदिप खाडे यांच्या संकल्पनेतून नाथ शिक्षण संस्थेतंर्गत स्व.पंडित (आण्णा) मुंडे क्रिडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. क्रिडा महोत्सवाचे उद्घाटन तालुक्यातील संगम येथील शारदाबाई गुरुलिंगआप्पा मेनकुदळे शाळेत करण्यात आले. उद्घाटन कार्यक्रमास उद्घाटक प्रा.प्रविण फुटके, प्रमुख पाहुणे पत्रकार महादेव गित्ते, संस्थेचे समन्वयक प्राचार्य अतुल दुबे, मुख्याध्यापक उत्तम साखरे उपस्थित होते. यावेळी प्रा. फुटके, प्राचार्य दुबे व पत्रकार गित्ते यांचा शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. प्रा.फुटके यांच्या हस्ते स्लो सायकलीग, १०० मी धावणे, लांबउडी, उंचवडी, गोळा फेक, थाळी फेक, कॅरम, बुद्धिबळ या स्पर्धाचे श्रीफळ वाढवून क्रिडा महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. पुढे बोलताना प्रा.फुटके म्हणाले की, विद्यार्थ्यांनी मोबाईलवर गेम न खेळता मैदानावर जावून खेळ खेळले पाहिजेत. आजचा विद्यार्थी मैदानापासून दूर चालला आहे. विद्यार्थ्यांनी खेळाकडे करिअर म्हणून सुध्दा बघितले पाहिजे. खेळामुळे विद्यार्थ्यांचे व्यक्तीमत्व घडते.यश-अपयश पचवण्याची ताकत विद्यार्थ्यांमध्ये येते असून येणाऱ्या काळामध्ये नाथ शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला स्वर्गीय पंडित (आण्णा) मुंडे क्रिडा महोत्सव लवकरच जिल्हा स्तरावर जाईल असे प्रतिपादन प्रा फुटके यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व मार्गदर्शन प्राचार्य अतुल दुबे यांनी केले. आमदार धनंजय मुंडे व सहसचिव प्रदिप खाडे यांच्या संकल्पनेतून स्व.पंडित आण्णा मुंडे क्रिडा महोत्सव सुरू केला असून भविष्यात तालुका, जिल्हा पातळीवर याचे नियोजन करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे प्राचार्य अतुल दुबे यांनी सांगितले. सूत्रसंचालन केंद्रे बि.डी. तर आभार मुख्याध्यापक यु. एस.साखरे यांनी केले तर कार्यक्रमास .आर.सी.गिराम आर. के.राठोड, एम.ए. कराड,शिक्षकेतर कर्मचारी एस. बी.आष्टेकर सर, डी. एस. स्वामी यांच्या सह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.