तलवारबाजी असोसिएशन तर्फे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जयंती साजरी
अहमदपूर (गोविंद काळे) : लातूर जिल्हा तलवारबाजी असोसिएशन तर्फे प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जयंती येथील अहिल्यादेवी होळकर विद्यालयाच्या सभागृहामध्ये साजरी करण्यात आली. गेल्या 14 वर्षापासून लातूर जिल्हा तलवारबाजी असोसिएशन तर्फे राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ जयंती साजरी केली जाते. या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून अहिल्यादेवी होळकर विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रशांत माने सर तर प्रमुख पाहुणे म्हणून रामलिंग तत्ता पुरे सर , प्रा.अभिजीत मोरे , प्रा अनिल चवळे, बासीतखान पठाण, प्रा बालाजी कारामुंगीकर, सादिक शेख, गणपतराव जाधव, रेखाताई गलाले, वंदनाताई भदाडे,लष्करी मॅडम आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. या कार्यक्रमाचे खास वैशिष्ट्य म्हणजे तलवारबाजी या खेळामध्ये आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय ,मिनी ओलंपिक, राज्य पातळी व विभागीय स्पर्धा मध्ये पदक विजेत्या खेळाडूंच्या मातांचा सन्मान करण्यात आला. आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक विजेते खेळाडू ज्ञानेश्वरी शिंदे, राष्ट्रीय स्तरावर पदक विजेते साईनाथ जंगवाड, जान्हवी जाधव, माही आरदवाड, दिव्यांका कदम, वैभवी माने , रोहिणी पाटील ,स्नेहा कश्यप यांच्या मातोश्री सह सर्व पदक विजेत्या खेळाडूंच्या मातांचा सत्कार यावेळी करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यक्रमाचे संयोजक व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त दत्ताभाऊ गलाले सर यांनी केले. प्रास्ताविक करताना लातूर जिल्हा तलवारबाजी
असोसिएशनच्या वाटचालीची व खेळाडूंच्या यशाची संपूर्ण माहिती सांगितली. यावेळी मनोगत व्यक्त करताना प्रा.अनिल चवळे यांनी समाजातील सर्व लोकांनी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श समोर ठेवला पाहिजे असे सांगितले. पालक माता म्हणून शेख समरीन यांनीही आपले विचार व्यक्त केले. अध्यक्षीय समारोप करताना प्रशांत माने सरांनी अहमदपूर येथील तलवारबाजीचे खेळाडू येत्या काळात निश्चितपणे कॉमनवेल्थ एशियाड व ऑलम्पिक स्पर्धा मध्ये खेळताना दिसतील ही अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज कदम सर यांनी केले तर आभार संतोष कदम यांनी मानले.