कारामुंगीकर परिवारांनी पक्षाच्या पिलाला दिले जिवदान
अहमदपूर (गोविंद काळे) : येथील कारामुंगीकर परिवाराने जखमी अवस्थेत असलेल्या पक्षाच्या पिलाला जिवदान दिले आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, परवा झालेल्या वादळी वार्यासह पाउस झाला आणि त्यामुळे घरट्यातील पारवा जातीचे पिल्लु खाली पडले आणि जखमी झाले. अश्याच अवस्थेत ते पडले होते. त्याला मुंग्या लागल्या होत्या. तशा अवस्थेत सौ. सुप्रिया कारामुंगीकर यांनी त्या पक्षास पाहिले आणि मुलगा अनिरुद्ध कारामुंगीकर यास सांगितले यानंतर दोघांनी मिळुन प्रा. बालाजी कारामुंगीकर यांना सांगितले आणि त्यानंतर त्या पक्षास घरात घेवून त्यावर सुश्रूषा केली. त्या पिलाच्या पंखाला जखम झाली होती. त्या जखमेवर हळद लावुन दोन दिवस त्याची देखभाल केली. त्यास पाणी पाजवीले, मऊ भात हाताने खाऊ घातला. सतत दोन दिवस त्या कोमल, नाजुक पक्षी पिलाची देखभाल केली दोन दिवसानंतर त्या पक्षाच्या पिलाच्या पंखामध्ये बळ आले जखमा बर्यापैकी दुरुस्त झाल्या होता. ते स्वतःहून पाणी पित होते. अन्नाचे कण खात होते. त्यानंतर दोन दिवसानी कारामुंगीकर परिवाराच्या घरी आलेले पक्षी पिलु पाहुणा गगनात भरारी मारले.
यावेळी सौ. सुप्रिया कारामुंगीकर यांच्याशी विचारले असता दोन दिवस हा पक्षी पाहुणा आमच्या घरी आल्यामुळे आम्हाला खुप बरे वाटत होते. आज तो उडून गेल्यामुळे आम्हाला खुप दुःख होत आहे. विश्वातील सर्व पशु पक्षांना जगण्याचा अधिकार आहे. मला या प्रसंगी असेच सांगावे वाटते की, जर कोणास अश्या जखमी अवस्थेत पक्षी आढळल्यास त्याच्यावर सुश्रुषा करुन त्याचा जीव वाचविला पाहिजे असेही त्या शेवटी म्हणाल्या.