राष्ट्राच्या शाश्वत विकासासाठी इंधन संरक्षण काळाची गरज- केदार खमितकर
अहमदपूर (प्रतिनिधी) : वाढत्या लोकसंख्येमुळे जगातील पारंपरिक उर्जा स्रोत संपण्याची भीती निर्माण झाली असून राष्ट्राच्या शाश्वत विकासासाठी इंधन संरक्षण काळाची गरज असल्याचे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध उर्जा अभ्यासक तथा उर्जा ऑडिटर केदार खमितकर यांनी केले.
याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, भारत सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या वतीने येथील महात्मा फुले महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या ‘उर्जा बचतीसाठी युवा कार्यशाळा ‘ या कार्यक्रमात श्री. खमितकर बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील हे होते तर, विचारपिठावर उपप्राचार्य डॉ. डी.डी. चौधरी, पेट्रोलियम कन्झर्वेशन रिसर्च असोसिएशनचे प्रवक्ते किरण खमितकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना श्री. खमितकर म्हणाले की, पारंपरिक ऊर्जा स्रोत हे दिवसेंदिवस आटत चालले असून इथेनॉल, सौर ऊर्जा, पवन ऊर्जा अशा नैसर्गिक संसाधनांचा यापुढे ऊर्जेसाठी मोठ्या प्रमाणात उपयोग करावा लागणार आहे. याबरोबरच प्रत्येकाने लहान लहान सवयींतून ऊर्जेची बचत केली पाहिजे असेही ते यावेळी म्हणाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील म्हणाले की, प्रत्येक माणूस हा ऊर्जास्रोत असून, उद्याच्या सुंदर दिवसांसाठी आजच बचतीची सवय लावली पाहिजे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी यापुढे समाजात अतिरिक्त ऊर्जेचा वापर होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. ‘बटन दाबा वीज वाचवा’ हे प्रत्येकाने लक्षात ठेवून समाजात वीज बचतीचा संदेश देत ऊर्जादूत बनले पाहिजे असेही ते म्हणाले. याप्रसंगी ऊर्जा बचत ची प्रतिज्ञा उपस्थित मान्यवरांना तसेच विद्यार्थ्यांना देण्यात आली. त्याचबरोबर महाविद्यालय परिसरात ‘ग्रीन ऑडिट’ ह करण्यात आले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपप्राचार्य डॉ. डी.डी. चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.आतिश आकडे यांनी केले तर ; अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रमुख प्रो.डॉ. नागराज मुळे यांनी सर्वांचे आभार मानले. या वेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
