भाषा ही मानवी जीवनाचे अविभाज्य अंग आहे – ह भ प बन गुरुजी उदगीरकर

भाषा ही मानवी जीवनाचे अविभाज्य अंग आहे - ह भ प बन गुरुजी उदगीरकर

उदगीर (प्रतिनिधी) : मराठी भाषा संवर्धन करावे अशी वेळ येऊ नये. कारण याला जबाबदार कोण आहे? याचा शोध आपण घेण्याची वेळ आलेली आहे. भाषेमुळे माणसे प्रवाहात येतात, अनेक माणसे भाषेमुळे उच्च पदावर गेलेली आहेत. तसे पाहायचे तर भाषा ही मानवी जीवनाचे अविभाज्य अंग आहे असे उद्गार ह भ प बन महाराज गुरुजी उदगीरकर यांनी काढले. ते शिवाजी महाविद्यालयामध्ये मराठी विभागाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त आयोजित केलेल्या समारोपप्रसंगी बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष उपप्राचार्य डॉ.आर एम मांजरे हे होते तर प्रमुख उपस्थिती विभाग प्रमुख सुरेश शिंदे ,अधीसभा सदस्य ग्रंथपाल डॉ विष्णू पवार, डॉ नरसिंग कदम, हिंदी विभाग प्रमुख डॉ व्ही के भालेराव, प्रा बालाजी सूर्यवंशी यांची होती. पुढे बोलताना बन गुरुजी म्हणाले भाषा ही साहित्याचे शरीर आहे. सूर्य चंद्र नष्ट झाली तरी मराठी भाषा नष्ट होणार नाही. जगामध्ये सूर्य चंद्र जेवढे सुंदर नाहीत तेवढी मराठी भाषा सुंदर आहे. ज्ञानभाषा व लोकभाषा एकच आहेत. त्या वेगळ्या होऊ शकत नाहीत. आई जशी बाळाच्या आरोग्याची काळजी घेते साहित्य समाज आणि सामाजिक जीवन घडवते. संताचं साहित्य जगातलं सर्वात महत्त्वाचं साहित्य आहे असेही याप्रसंगी ते म्हणाले. दि. 14 जानेवारी ते 28 जानेवारी हा मराठी भाषा संवर्धन पंधरवडा आहे. यानिमित्ताने मराठी विभागातर्फे निबंध स्पर्धा ,सुंदर हस्ताक्षर स्पर्धा,आणि शुद्धलेखन स्पर्धेचे आयोजन केलेले होते. निबंध स्पर्धेमध्ये प्रथम भूसागरे दिव्या दत्तात्रय,द्वितीय पटके पल्लवी अंबादास, तृतीय तोंडारे अश्विनी विलास,उत्तेजनार्थ गर्जे शालिनी श्याम,सुंदर हस्ताक्षर स्पर्धेमध्ये प्रथम माने गौतमी गणेश, द्वितीय देवनाळे कोमल गोपाळ, तृतीय मेळकुंदे प्रतीक्षा प्रताप, उत्तेजनार्थ पटके पल्लवी अंबादास तर शुद्धलेखन स्पर्धेत प्रथम शेळके राणी माणिक, द्वितीय घुगे साक्षी शरदकुमार, तृतीय कोतवाल आयशा गफूर व उत्तेजनार्थ भंडे वैभवी शिवाजी यांनी असे क्रमांक प्राप्त केले. या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र ,रोख रक्कम व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. अध्यक्षीय समारोपप्रसंगी उपप्राचार्य डॉ मांजरे म्हणाले 1991 नंतर जागतिकीकरण आलं. भारतातील 1652 बोलीभाषा आहेत त्या लुप्त होत आहेत असे दिसत आहे.अनेक संकटे येतात तसेच मराठी भाषेवर संकटे येत आहेत परंतु तरीही मराठी भाषा ही आपले अस्तित्व टिकवून आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ. सुरेश शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.एन एस केंद्रे यांनी तर आभार डॉ नरसिंग कदम यांनी मानले. कार्यक्रमाला विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

error: Content is protected !!