“जागल” साहित्य संमेलनात रंगले निमंत्रितांचे कविसंमेलन
अहमदपूर (गोविंद काळे) : मराठवाडा साहित्य परिषद अहमदपूर तर्फे आयोजित पहिले एक दिवसीय साहित्य संमेलन “जागल” मध्ये तिसऱ्या सत्रात आयोजित जेष्ठ कवी उदयकुमार जोशी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित निमंत्रितांच्या कवी संमेलनात राजसाहेब कदम, ललिता गादगे मॅडम, वैजनाथ गीत्ते, बालाजी मुंडे, महेंद्र खंडागळे, तुकाराम हारगिले, शाहिदा सय्यद बेगम , अनिल चवळे, विद्या बयास या कवींनीआपल्या कविता सादर करत चांगलीच रंगत आणलीअहमदपूर तालुक्यातील उगिलेवाडी ” तुकाराम फार्म”येथे निसर्गरम्य वातावरणात मान्यवर कवींनी आपल्या कविता सादर केल्या. येलदरी येथील शेतीमातीतील कवी वैजनाथ गीते यांनी कविता सादर करताना राब राबत्या रानात, चिंब भिजुनी घामात चतकोर तुकड्यावर, बाप राबतो अजून. ही कविता सादर करत शेतीच्या अनेक व्यथा श्रोत्यांसमोर मांडल्या. यानंतर कवी महेंद्र खंडागळे यांनी हळुवार प्रेमाचा भाव असणारी कविता आताशा रात्र कधीही तशी सुंदर दिसत नाही गालावर गोड खळी पाडत पूर्वीसारखी हसत नाही ही कविता सादर करताना श्रोत्यांच्या टाळ्या मिळवल्या. यानंतर पर्यावरण वादी कवी अनिल चवळे यांनी पर्यावरणाच्या अनुषंगाने चेतावणी देताना “येणाऱ्या पिढ्या माफ करतील का आम्हाला” ही कविता सादर केली. ग्रामीण कवी गझलकार बालाजी मुंडे यांनी स्त्रीभ्रूण हत्या या विषयावर “गर्भाशयात डोकावणारा एक एक डोळा फोडावा लागेल” ही कविता अतिशय प्रभावीपणे सादर करत प्रेक्षकांच्या प्रचंड टाळ्या मिळवल्या. साहित्यसंमेलनाच्या अध्यक्षा तथा सुप्रसिद्ध कवयित्री ललिता गादगे मॅडम यांनी महात्मा गांधी यांच्यावर बापू नावाची चिंतनीय व गंभीर कविता यावेळी सादर केली व उपस्थितना चिंतन करण्यास भाग पाडले. परिवर्तनवादी कवी प्राचार्य तुकाराम हरगिले यांनी “प्रभात झाली” ही कविता सादर करताना अंधार गेला दुनियेला जागा आली धरणी हर्षभरीत झाली, बाबासाहेब तुमच्या येण्याने. ही अतिशय उत्कृष्ट कविता सादर केली कवयित्री प्रा विद्या बयास यांनी. बाहेर किंचित अधिक वेळ रेंगाळलेल्या पावलांनी घरात पेटवून दिलेला असतो आगडोंब. ही सामाजिक आशयाची कविता सादर करत श्रोत्यांचे मने जिंकली.
कवयत्री शाहिदा सय्यद बेगम यांनी या धकाधकीच्या जीवनात मानव शांती शोधत आहे अशा आशयाची कविता सादर केली. अध्यक्षीय समारोप करताना कवी संमेलनाचे अध्यक्ष उदय कुमार जोशी यांनी सर्व कवींच्या कवितांची समीक्षा केली व त्यांची एक सुंदर कविता सादर करत गांधीजी ,आता तुमचे आमचे संबंध फक्त जयंती पुण्यतिथी साजऱ्या करण्या इतपतच उरले आहेत.” या कवितेने कवीसंमेलनाचा समारोप केला. या कवी संमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन सुप्रसिद्ध कवी राजेसाहेब कदम यांनी केले. यावेळेस त्यांनी सामाजिक विषमतेवर भाष्य करताना “तुमचंच तेल आग लेवून, तुमच्याचय महालांना आग लावल्याशिवाय राहणार नाही.” ही कविता सादर करत श्रोत्यांची प्रचंड दाद मिळवली. तब्बल दोन तास कवी राजे साहेब कदम यांनी आपल्या सूत्रसंचालना मधून सर्व कवींना एका माळेत गुंफून श्रोत्यांना खेळवत ठेवले. अतिशय रंगतदार झालेल्या कवी संमेलनाचा आस्वाद उपस्थित श्रोत्यांनी घेतला या कार्यक्रमाचे आयोजन मराठवाडा साहित्य परिषद अहमदपूरच्या वतीने परिषदेचे अध्यक्ष सत्यनारायण काळे, कार्यवाह द. मा. माने, सहकार्यवहा जिलानी शेख यांच्यासह सर्व कार्यकारणी व सन्माननीय सदस्यांनी स्वागताध्यक्ष डॉ. चंद्रकांत उगले यांच्या सहकार्याने आयोजन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामलिंगी तत्तापुरे यांनी तर आभार हरिदास तम्मेवार यांनी मानले. कार्यक्रमास शहर व परिसरातील श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
