विद्यार्थ्यांच्या पंखात बळ देऊन “झेप” घेण्याचे सामर्थ्य टाइम्स पब्लिक स्कूल देत आहे – आ. बनसोडे
उदगीर (एल. पी. उगीले) : उदगीर येथील सेंट जॉन्स एज्युकेशन सोसायटी द्वारा संचलित टाइम्स पब्लिक स्कूलच्या रोप्यमहोत्सवा निमित्य वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन करताना माजी गृहराज्यमंत्री तथा उदगीरचे आमदार संजय बनसोडे यांनी सांगितले की, उदगीर हे शिक्षण पंढरी असून, अनेक शाळा आपापल्या परीने शैक्षणिक क्षेत्राच्या प्रगतीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. टाइम्स पब्लिक स्कूल देखील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करत आहे. उदगीरचा लोकप्रतिनिधी म्हणून या गोष्टीचे कौतुक आणि अभिमान वाटतो. या शाळेच्या प्रगतीसाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करायला सदैव तत्पर आहोत. या शाळेला येण्यासाठी जो रस्ता आवश्यक आहे, तो रस्ता बनवण्यासाठी आपण आपल्या फंडातून 25 लाख रुपये निधी देणार असल्याचे त्यांनी याप्रसंगी जाहीर केले. विद्यार्थ्यांचा विकास हा राष्ट्राचा विकास असल्याने विद्यार्थ्यांसाठी विविध प्रकल्पांतर्गत सर्वतोपरी आपण सहकार्य करू, असेही आश्वासन त्यांनी याप्रसंगी दिले.
टाइम्स पब्लिक स्कूलच्या परंपरेनुसार विशिष्ट संकल्पना घेऊन दरवर्षी वार्षिक स्नेहसंमेलनाच्या आयोजन करण्यात येते. यावर्षी “झेप” या संकल्पनेवर आधारित कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, राष्ट्रीय एकात्मता, राष्ट्रप्रेम, ध्येय निश्चिती, निसर्गाबाबतची कृतज्ञता, समाजहित, पर्यावरण जनजागरण, लोककला परंपरा, नाटक, अभिनय, नृत्य अशा विविध कला गुणांचा विकास करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये सामाजिक जाणीव रुजवण्यासाठी विविध गुणदर्शनाचे अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.
या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थितात, सेंट जॉन्स एज्युकेशन सोसायटी या शैक्षणिक संस्थेच्या अध्यक्ष ईश्वर प्रसाद बाहेती, प्रदीप पेन्सिलवर, सतीश बेद्रे, डॉक्टर रामप्रसाद लखोटिया, संस्थेचे सचिव विजयकुमार कपिकेरे, मंगला कपिकेरे तसेच संस्थेचे इतर सदस्य गण मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या महानंदा दीदी, टाइम्स पब्लिक स्कूलचे प्राचार्य अभिजीत नळगीरकर हेही उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य अभिजीत नळगिरकर यांनी केले. आपल्या प्रास्ताविक पर भाषणातून शाळेच्या विकासाचा आलेख त्यांनी पालक आणि उपस्थित यांच्या समोर मांडला. याप्रसंगी अध्यक्ष समारोप करताना ईश्वर प्रसाद बाहेती यांनी सांगितले की, शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. ती व्यवस्थित चालावी, यासाठी टाइम्स पब्लिक स्कूलच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने सामाजिक बांधिलकी समजून मोठे योगदान दिले जात आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. प्रतिभा शेरीकर व सौ. बबीता मसगले यांनी केले, तर आभार प्रदर्शन विष्णू भालेराव यांनी केले. या कार्यक्रमासाठी विद्यार्थी, पालक, समाजबांधव शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
