अवैध दारू विक्रीच्या विरोधात कुमठा येथे रणरागिणींचा उग्र अवतार!!
उदगीर (एल. पी. उगिले) : उदगीर तालुक्यातील कुमठा (खुर्द) येथे अवैध दारू विक्रीचे प्रमाण वाढल्यामुळे युवकांमध्ये व्यसनाधीनता बळावत चालली आहे. सहज उपलब्ध होणाऱ्या मात्र बनावट आणि विषारी ठरू शकणाऱ्या, इतर राज्यातील मद्यसाठ्यात रसायन मिश्रित करून वाटेल त्या कंपनीच्या बॉटलमध्ये भरून सीलबंद करून, विक्री करण्याची प्रक्रिया ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात चालू आहे. यासंदर्भात वेळोवेळी उदगीर तालुक्यातील लोणी, लोणी मोड, तोंडार पाटी, तोंडार, कुमठा या ठिकाणच्या नागरिकांनी आणि महिलांनी वेळोवेळी ग्रामीण पोलिसांना निवेदन देऊन, तक्रारी करून देखील पोलिसांच्या वतीने थातूरमातूर कारवाईच्या पलीकडे काहीही केले गेले नाही, किंवा या अवैध दारू विक्रीला आळा घातला नाही. म्हणून शेवटी कुमठा येथील रणरागिणींनी आक्रमक भूमिका घेत, दारू विक्री करणाऱ्यांच्या घरावरच मोर्चा काढून त्या ठिकाणी विक्री होत असलेल्या दारू आणि विक्री झाल्यानंतर रिकाम्या पडलेल्या बाटल्या यांचा पंचनामा करून त्याची व्हिडिओ क्लिप समाज माध्यमावर टाकली आहे.
सहज उपलब्ध होणाऱ्या अवैध दारू विक्रीमुळे गावातील कायदा आणि सुव्यवस्था वेशीला टांगला जातो आहे. शांततेचा भंग करत, हे तळीराम दारू पिऊन घरोघरी वाद घालत, तंटे निर्माण करत असल्याचीही ओरड आहे. आपल्याला होणाऱ्या या त्रासाच्या संदर्भात पोलीस प्रशासन काहीच करत नाही, याचा राग आल्याने जवळपास 100 महिलांनी आपला मोर्चा अवैध दारू विक्री करणाऱ्यांच्या घरावरच काढला. खरंतर गेल्या कित्येक वर्षापासून कुमठा गावात अवैध दारू विक्री चालू असून यामुळे अनेक अनर्थ घडले आहेत. दिवसेंदिवस गावात वाद निर्माण झाल्याने गटबाजी आणि गटातटाचे राजकारण निर्माण झाल्याने, घराघरांमध्ये वाद सुरू झाले आहेत. अनेक घरात पती-पत्नीतच कलह होत असून दारू पिऊन महिलांना मारहाण होणे, आरडाऔरड करणे, असे प्रकार मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचेही ग्रामस्थ सांगतात. कित्येक वेळा उदगीर ग्रामीण पोलिसांना महिला आणि ग्रामस्थांनी सदरील अवैध दारू विक्री बंद करावी, म्हणून निवेदन दिले.मात्र कोणतीही कारवाई झाली नाही. झालेली कारवाई ही दारू विक्रेत्यावर न होता किरकोळ स्वरूपात दारू बाळगणारे तळीराम यांच्यावर झाली आहे. ह्या तात्पुरत्या स्वरूपातील कारवाईमुळे कायमचा तोडगा निघाला नाही. ग्रामस्थांची ओरड विचारात घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष सुनील केंद्रे यांच्या नेतृत्वाखाली गावातील महिलांनी अवैध दारू विक्रीच्या विरोधात चक्क रस्त्यावर उतरून दारू विक्रेत्यांच्या घरावरच मोर्चा चढवला! व दारू विक्रेत्यांच्या घराची झाडाझडती घेतली! दारू शोधून काढत, सापडलेल्या बाटल्या त्यांच्या घरातच फोडून टाकण्यात आल्या. या रणरागिणीचा रुद्र अवतार पाहून अवैध दारू विक्रेत्यांची त्रेधातिरपट उडाली.
रणरागिणींच्या या अवताराने आणि आक्रमक भूमिकेने पोलीस प्रशासनाच्या निष्क्रियतेवर शिक्कामोर्तब करत पोलीस प्रशासनाच्या प्रतिष्ठेला काळीमा फासलीगेल्याने, प्रशासन काय कारवाई करणार? जिल्हा पोलीस अधीक्षक अत्यंत कर्तव्य कठोर असून अवैध धंद्याच्या विरोधात जिल्हाभर त्यांनी मोहीम सुरू केली आहे मात्र दुर्दैवाने इतर कर्मचारी आणि स्थानिक पातळीवरील अधिकारी हे अवैध धंदेवाल्याच्या ताटाखालचे मांजर बनले आहेत की काय? असा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेला निर्माण झाला आहे. अवैध धंद्याला बळ देणाऱ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यावर दंडात्मक कारवाई झाल्याशिवाय अशा प्रकाराला आळा बसणार नसल्याची ही चर्चा गावागावातून चालू आहे.
