डी वाय एस पी च्या पथकाची धडाकेबाज कामगिरी!! ग्रामीण पोलिसांच्या नाकावर टिचून तीन लाख 68 हजाराचा गुटखा पकडला !!!
उदगीर (एल. पी. उगिले) उदगीर शहर आणि ग्रामीण भागात कर्नाटकातून मार्गे तोगरी मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा, पान मसाला सर्रास अवैध विक्रीसाठी उपलब्ध करून दिला जातो आहे. फक्त उदगीरच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यात तोगरी, औराद शहाजानी मार्गे महाराष्ट्रामध्ये गुटखा आणला जातो. यापूर्वी देखील उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या पथकाने वेळोवेळी अवैध गुटखा वाहतुकीला प्रतिबंध घालण्यासाठी धाडी टाकून लाखो रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. या पथकाने पहाटे चार वाजण्याच्या सुमारास बिदर रोडवरील वळण रस्त्याच्या चौकात एका वाहनाच्या तपासणीमध्ये तीन लाख 68 हजार 958 रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त करून दोन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलीस सूत्राकडून हाती आलेली माहिती अशी की, महाराष्ट्राच्या प्रतिबंधित असलेला गुटखा सर्रासपणे कर्नाटक राज्यातून महाराष्ट्रामध्ये आणून सीमावर्ती भागातील गावात आणि शहरात राजरोसपणे प्रत्येक पान टपरी आणि चहाच्या टपऱ्यावर उपलब्ध करून दिला जातो आहे. एकूण मुर्दाड पोलीस प्रशासन आणि कामचुकार कर्मचारी यामुळे अवैध धंद्याला बळ मिळत असल्याची चर्चा चालू आहे. या गोष्टीचे गांभीर्य विचारात घेऊन उदगीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॅनियल जॉन बेन यांनी अवैध दारू आणि गुटखा विरोधात मोहीम सुरू करून धाडी टाकण्याचे सत्र चालू केले आहे. विशेषतः उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध धंदे बोकाळले असल्याची ओरड असताना सुद्धा पोलीस कर्मचारी आणि अधिकारी मूग गिळून गप्प राहत होते, त्यामुळे डी वाय एस पी च्या पथकाने विशेष मोहीम राबवत पहाटे पावणेचार च्या सुमारास (महिंद्रा कंपनीची लाल रंगाची झायलो गाडी एम एच 04 ए डी 37 63) या वाहनातून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला तीन लाख 68 हजार 958 रुपये किमतीचा विमल पान मसाला आणि प्रतिबंधित गुटखा अन्नपदार्थाचा साठा आढळून आला. पोलिसांनी सदरील साठा आणि वाहन जप्त केले आहे. याप्रकरणी पोलीस नाईक अजय भंडारे यांनी उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीवरून आरोपी इसा रहीमतुल्ला तांबोळी आणि जिलानी मन्नान मणियार रा. अहमदपूर या दोघांवर कायदेशीर कारवाई करून उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गु.र. क्रमांक 67 /23 कलम 188, 272, 273, 328 भारतीय दंड विधान संहिता सह कलम 59 अन्नसुरक्षा व मानके कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करून ग्रामीण पोलिस तपास करत आहेत.
