देशावर एकच संस्कृती लादण्याचा प्रयत्न – नितिन वैद्य
उदगीर(एल.पी.उगीले) : धार्मिक व स्वांस्कृतीक विविधता हे भारताच्या एकात्मतेचे वैशिष्ट आहे़, मात्र गेल्या काही वर्षांमध्ये त्यावर विशिष्ट एकच संस्कृती लादण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात केला जात आहे़. हे कटकारस्थान रोखने हे आज घडीला सर्वात मोठे आव्हान आहे़. ही विध्वंसक कृती रोखली तरच भारताची अखंडता कायम राहिल, असे परखड मत राष्ट्र सेवादलाचे राष्ट्रीय अध्यक्ष व प्रसिध्द चित्रपट निर्माते नितिन वैद्य यांनी केले.
डॉ. ना. य. डोळे फाऊंंडेशनच्या वतीने दिला जाणारा ‘डॉ. ना. य. डोळे स्मृती पुरस्कार’ नितिन वैद्य यांना प्रदान करण्यात आला. त्या प्रसंगी ते बोलत होते. जनता दल युनायटेडचे राष्ट्रीय सचिव, आमदार कपिल पाटील यांनी उदगीर येथे वैद्य यांना हा पुरस्कार प्रदान केला. या प्रसंगी मंचावर माजी राज्यमंत्री आ. संजय बनसोडे, माजी आ. गोविंद केंद्रे, माजी आ. शिवराज तोंडचीरकर, जिल्हा परिषदेच्या माजी सभापती शिलाताई पाटील, फाऊंडेशनचे सचिव अजित शिंदे, कोषाध्यक्ष अंकुश गायकवाड, विश्वस्त जशन डोळे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक फाऊंडेशनचे विश्वस्त विनायक चाकुरे यांनी केले. तर मानपत्राचे वाचन फाऊंडेशनचे सहसचिव पुरुषोत्तम भांगे यांनी केले.
या वेळी पुढे बोलताना वैद्य म्हणाले की, सध्या बेरोजगारी ही सर्वात मोठी समस्या आहे. रोजगार निर्मिती न करणारा विकास ही परिस्थीती तरुणांसाठी धोकादायक आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी सर्वस्तरांतील नागरिकांची एकजुट गरजेची असल्याचे ते म्हणाले. माध्यमांच्या सध्याच्या वाटचालीबद्दल वैद्य यांनी चिंता व्यक्त केली. अध्यक्षीय समारोप करताना आमदार कपील पाटील म्हणाले की, डॉ. ना. य. डोळे यांनी देशभरातील समाजवादी कार्यकर्त्यांना अन्यायाविरुध्द लढण्याची दृष्टी दिली. त्यामुळे उदगीर हे शहर आमच्यासाठी तिर्थक्षेत्र आहे़. सध्याचे विद्वेषाचे राजकारण उलथुन टाकण्यासाठी डॉ. डोळे यांच्या विचाराची गरज असल्याचे त्यांनी सांगीतले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दीलीप वाघमारे यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बापुसाहेब कज्जेवाड, कृष्णा स्वामी, ओम गांजुरे, रविंद्र हसरगुंडे, अशिष राजुरकर, विक्रम हलकिकर, मोतीलाल डोइजोडे, राजकुमार करंजे, धनाजी आपटे, राजकुमार मोगले, फिरोज देशमुख, अॅॅॅॅड. प्रदीप पाटील, अॅड. पवन कोणे, वसंत बिबिनवरे, प्रमोद भांगे, ओमप्रकाश भांगे, प्रमोद जोशी, राजेंद्र सूर्यवंशी, शिवाजी बिबिनवरे यांनी परिश्रम घेतले.
