जागतिक मत्स्य व्यवसाय दिनानिमित्त रऊफ शेख यांनी केलेल्या मागणीला यश
उदगीर (एल.पी.उगीले) : दमन येथे संपन्न झालेल्या जागतिक मत्स्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात लातूर जिल्ह्याचे एकमेव प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहुन, आपले म्हणणे मांडलेल्या रऊफ शेख यांच्या मागणीला अखेर यश आले आहे.
रऊफ शेख यांनी सागरी भागातील मत्स्यवसायिकांना ज्याप्रमाणे नौका खरेदीसाठी व जाळी खरेदीसाठी शासन मोठ्या प्रमाणात अनुदान देते, अगदी त्याच धर्तीवर महाराष्ट्रातील भूजलाशयातील गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसाय, सहकारी संस्थेच्या सभासदांना किंवा संस्थांना मासेमारी नौका खरेदीसाठी व जाळी खरेदीसाठी शासनाने अनुदान द्यावे. ही मागणी त्यांनी जागतिक मत्स्य व्यवसाय दिनानिमित्त दमण येथील कार्यक्रमात केली होती.
त्यावेळी मत्स्य व्यवसाय विभागाचे केंद्रातील अधिकारी व महाराष्ट्रातील अधिकाऱ्यांनी आपल्या मागणीचा भविष्यात निश्चित विचार करू. असा शब्द सर्व उपस्थित मच्छीमार प्रतिनिधी समोर दिला होता.व दिलेल्या शब्दाप्रमाणे दिनांक 09/02/2023 रोजी कृषी पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्य विभागाने शासन निर्णय काढून, भूजल क्षेत्रातील मत्स्य व्यवसायिकांना व मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांना न्याय दिल्याची भावना वाढवणा मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थेचे सचिव तथा लातूर जिल्हा मत्स्य व्यवसाय संघर्ष समितीचे जिल्हाध्यक्ष रऊफ शेख यांनी बोलून दाखवले.
