छत्रपती शिवरायांनी अठरापगड मावळ्यांना एकत्र करून स्वराज्य निर्माण केले – प्रदीप ढगे
उदगीर (एल.पी.उगीले) : छत्रपती शिवरायांनी अठरापगड मावळ्यांना एकत्र करून स्वराज्य निर्माण केले. सय्यद बंडाला ठार करून शिवरायांचे प्राण वाचवणारे जिवाजी महाले, पन्हाळा किल्ल्यावरून महाराज सुखरूप बाहेर पडावेत यासाठी बलीदान देणारे जिवा महाले, बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी, फिरंगोजी नरसाळा, मायनाक भंडारी, रायनाक महार, मदारी मेहतर, सिद्दी इब्राहिम, सिद्दी हिलाल, संभाजी कावजी, मुरा लमाण, सटवा मांग, हणुमंत गोसावी, तानाजी मालुसरे, प्रतापराव गुजर, बाजी पासलकर, कान्होजी जेधे अशा विविध जाती धर्मातील मावळ्यांनी स्वराज्यासाठी निष्ठेने काम केले. सुलतानी आणि आस्मानी संकटाला वैतागलेल्या सर्वसामान्य माणसांना स्वराज्य हे माझे राज्य आहे, असे वाटत होते. आपल्या माय लेकींची अब्रू वाचवण्यासाठी स्वराज्य निर्माण होणे प्रत्येकाला अगत्याचे वाटत होते. असे मत सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समिती, उदगीर आयोजित व्याख्यानमालेत सुप्रसिद्ध शिवव्याख्याते शिवश्री प्रदीप ढगे यांनी मांडले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आडत वेलफेअर असोसिएशचे अध्यक्ष संभाजी घोगरे, प्रमुख पाहुणे म्हणून सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अजित पाटील तोंडचिरकर,विद्यालयाचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक बाबुराव नागरवाड, पर्यवेक्षक व्ही .एम बांगे, विद्यावर्धिनी इंग्लिश स्कूलच्या प्राचार्य सुप्रिया पाटील, शिल्पा पाटील, विराज पाटील शिरोळकर ,गोविंद पाटील यांची यावेळी उपस्थिती होती. शिवसप्ताहाच्या दुसऱ्या दिवशी बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवराय या विषयावर प्रदीप ढगे यांनी व्याख्यान दिले.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, शिवरायांनी शेतकऱ्यांना संरक्षण दिले. सर्व जाती धर्मातीलच नव्हे तर शत्रूच्या स्त्रियांचा देखील सन्मान शिवरायांनी केला, म्हणून मुस्लिमांना सुद्धा स्वराज्य हवेहवेसे वाटले. म्हणूनच आदिलशाही सोडून सातशे पठाण स्वराज्यात सामील झाले.
व्याख्यानमालीचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कला शिक्षक एन.आर जवळे, के. एम राजुरकर, चंद्रकांत जाधव, एम.एस जाधव यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी. व्ही बिरादार यांनी केले तर आभार राम ढगे यांनी मानले.