संवेदनशील माणसाच्या उपेक्षांचे चित्र म्हणजे नटसम्राट होय – नागटिळक
उदगीर (एल.पी.उगीले ) : माणूस संसारात पडला की त्याला संतती आणि संपत्तीची हाव निर्माण होते. याच नादात मोठ्या कष्टाने धनसंपत्ती कमवतो. मुलांना लहानांचे मोठे करतो. त्यांच्या सुखासाठी स्वतः दुःखही सहन करतो. परंतु हीच मुले मोठी झाली, त्यांची लग्न लावून दिले की, ते जेंव्हा आपल्या पत्नी सोबत आधुनिकतेच्या बेगडी मोठेपणात जगायला लागतात. तेंव्हा ज्यांनी मोठ्या कष्टाने आपल्यासाठी धनसंपत्ती कमावून ठेवली त्या वयोवृद्धांना छळतात, अशा वेळी संवेदनशील मनाच्या माणसाची होणारी उपेक्षा याचे भावनिक चित्रण नटसम्राट मध्ये केले गेले आहे. असे मत प्रसिद्ध साहित्यिक तथा नाटककार फुलचंद नागटिळक यांनी व्यक्त केले.
चला कवितेच्या बनात अंतर्गत शिवाजी महाविद्यालय उदगीर येथे उपप्राचार्य डॉ. रामकिशन मांजरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या २८२ व्या वाचक संवाद मध्ये प्रसिद्ध साहित्यिक, समाज प्रबोधनकार तथा सिने अभिनेते फुलचंद नागटिळक यांनी वि.वा.शिरवाडकर लिखित नटसम्राट या साहित्यकृतीवर संवाद साधताना एकपात्री नाट्यप्रयोग सादर करून रसिकांची मने जिंकली. त्यांचा हा 6719 वा प्रयोग होता. रंगमंच गाजवणे हे अत्यंत अवघड काम नागटिळक यांनी सोपे केले. योग्य पाठांतर, आवाज, वेगवेगळे हावभाव, व्यक्त होण्याची पद्धत, पात्राची तत्त्वशीलता आणि भावना, व समर्पक भाषा अशा सर्वांग सुंदर पद्धतीने केलेले सादरीकरण प्रेक्षकांना खूपच भावले. नागटिळक यांच्या या एकपात्री प्रयोगाचे सादरीकरण जल, स्थल आणि वायू अशा तिन्ही ठिकाणी झाले आहेत. समाज प्रबोधन व परिवर्तन घडवून आणण्यासाठी ते जत्रा, वारी, संमेलन व सांस्कृतिक कार्यक्रमात गाडगेबाबांची भूमिका वटवतात. असे हरहुन्नरी कलाकार नागटिळक यांनी वाचक संवादात आत्मसंवाद साधत हावभाव युक्त भावना व्यक्त केल्या.
अध्यक्षीय भाषणात डॉ. रामकिशन मांजरे म्हणाले की, हा वाचक संवाद म्हणजे ज्ञानाची अनुभूती देणारा असून आपले विचार प्रगल्भ बनवणारा आहे. हा कार्यक्रम म्हणजे एक अखंडितपणे चालणारा ज्ञानयज्ञ असून आम्हा उदगीरकरांचा अभिमान आहे. याचा फायदा जास्तीत जास्त लोकांनी घेतला पाहिजे. संचलन संयोजक अनंत कदम यांनी केले, पाहुण्यांचा परिचय प्रा. बालाजी सूर्यवंशी यांनी केले. तर आभार प्रसिद्ध समीक्षक किशन उगले यांनी मानले. या कार्यक्रमास मस्कत ओमान येथून भीम हंगरगे, बाबुराव सोमवंशी (सुभेदार), भागवत जाधव (पोलिस अधिकारी ) तुकाराम कांबळे ( BDO), बालाजी बिरादार (BEO), तुळशीदास बिरादार (नाटय़लेखक), मांगूळकर सुधाकर (व्यापारी), कांता कलबुर्गे,डॉ. वर्षा वैध,रेखा शिवपुजे , आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.