हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार – भरत चामले

हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणार - भरत चामले

उदगीर (एल. पी. उगीले) शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा, या उद्देशाने किमान हमीदरानुसार शेतमाल खरेदी विक्री केला जावा, म्हणून शासनाकडून किमान हमी दरानुसार शेतमाल विक्रीसाठी पूर्व नोंदणी प्रक्रिया सुरू करून विक्रीची व्यवस्था केली जाते. असे असताना देखील सद्यस्थितीत हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना किमान हमीभावानुसार हरभरा विक्री करण्यासाठी विक्रीपूर्व नोंदणी प्रक्रिया अद्याप सुरू केलेली नाही. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाचे संचालक तथा स्वर्गीय रामचंद्रराव पाटील तळेगावकर तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन भरत चामले यांच्याशी हरभरा उत्पादक शेतकऱ्यांनी संपर्क साधला असता, आपण शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ. त्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करू, अशी आश्वासन त्यांनी दिले.

वास्तविक पाहता किमान हमीदरानुसार हरभरे विक्री करण्यासाठी शासनाच्या वतीने नोंदणी गरजेचे असते. मात्र अद्याप या बाबीकडे कोणी लक्ष दिलेले नाही. त्यासाठी शेतकरी वर्गातून शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे. तात्काळ ऑनलाईन नोंदणी सुरू करावी, आणि शेतकऱ्यांची होत असलेली हेळसांड थांबवावी. सध्या बाजारात हरभरा येऊ लागलेला आहे. मात्र व्यापारी वर्ग हरभऱ्याला कमी भाव देत असल्याचे शेतकरी बोलत आहेत. एफसीआय द्वारे राज्यात विविध राज्य अभिकर्ता संस्थाकडून किमान हमीभाव दरानुसार शेतमाल खरेदी केला जातो. यंदा बाजारात तूर, मूग, उडीद, सोयाबीन आदी शेतमालाला हमीभावापेक्षा अधिक दर राहिल्याने, शासनाला बाजार हस्तक्षेप योजनेत उतरण्याची गरज पडली नव्हती. त्यामुळे यंदा शासकीय खरेदी केंद्रावर कोणाच्याही शेतीमालाची खरेदी झाली नाही.

राज्यात सध्या हरभरा विक्रीसाठी येत आहे. या हरभऱ्याला 4200 ते साडेचार हजार रुपयापर्यंत दर मिळत आहेत. हरभऱ्याला केंद्राने पाच हजार तीनशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल दर जाहीर केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांनी शेतमाल घरीच ठेवून शासकीय खरेदी केंद्रात देण्यासाठी सातबारावर पीक पेऱ्याची नोंद केली आहे, परंतु राज्यात नाफेड कडून शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्यासंदर्भात अद्याप हालचाली दिसत नाहीत. मागील वर्षी 15 फेब्रुवारी रोजी हरभरा विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी सुरू झाली होती. तसेच प्रत्यक्ष खरेदीची प्रक्रिया एक मार्च रोजी सुरू झाली होती. यावर्षी दुर्दैवाने अद्याप नोंदणीची प्रक्रिया सुरू झाली नसल्याने बाजारामध्ये हरभऱ्याचे दर कोसळले आहेत. त्यामुळे हरभरा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडल्यामुळे शेतकऱ्यांचे शिष्ट मंडळ खरेदी विक्री संघाचे चेअरमन भरत चामले यांना भेटून तात्काळ शासनाकडून ही प्रक्रिया सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली आहे. या शेतकरी शिष्ट मंडळास चेअरमन भरत चामले यांनी अश्वस्त करून शासकीय पातळीवर आपण सर्वतोपरी प्रयत्न करू. असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे काही प्रमाणात शेतकऱ्यांना धीर आला आहे.

About The Author