कुठे अवैध दारू विक्रीसाठी चढाओढि!! तर कुठे पडत आहेत धाडी !!

कुठे अवैध दारू विक्रीसाठी चढाओढि!! तर कुठे पडत आहेत धाडी !!

उदगीर(एल.पी.उगीले) : शहर आणि ग्रामीण भागात अवैध धंदे बोकाळल्यामुळे प्रसिद्धी माध्यमांनी उठवलेल्या आवाजामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उदगीर शहर आणि ग्रामीण दोन्ही पोलीस स्टेशनसाठी नवीन पोलीस अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे. ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पवार यांनी रुजू झाल्यानंतर पत्रकारांना संबोधित करताना, अवैध धंद्यांना मूठ माती देणार, कोणताही अवैध धंदा जसे की अवैध दारू विक्री, मटका, गुटखा हे काहीही चालणार नाही. असे सांगितले होते, मात्र त्यांचा आवाज लोक विसरतात न विसरतात तोच, लोणी ग्रामपंचायतच्या वतीने पोलीस उपाधीक्षक यांना निवेदन देऊन लोणी हद्दीतील अवैध दारू दुकाने बंद करण्याची मागणी केली आहे. लोणी गावांमध्ये दारूचे दुकाने असून गावातील तरुण वर्ग व इतर व्यसनाधीन होत आहेत. तसेच व्यसनाधीन झालेले तरुण चक्क शाळेमध्ये धिंगाणा घालत आहेत. रस्त्यावरील कोणत्याही व्यक्तीला शिवीगाळ करत आहेत. गावांमध्ये असंतोष निर्माण करत आहेत. तरुण पिढींचा संसार या अवैध दारू विक्रीमुळे उद्ध्वस्त होण्याच्या वाटेवर आहे. दारूमुळे विनाकारण वाद वाढत आहेत. वादांचे रूपांतर नंतर मोठ्या गुन्ह्यांमध्ये होऊ शकते, ही शक्यता विचारात घेऊन गावात निर्माण झालेला असंतोष कमी करण्यासाठी तसेच गाव पातळीवर शांतता, सुव्यवस्था टिकून राहावी म्हणून खुलेआम विक्री होत असलेली अवैध, विनापरवाना देशी दारू, हातभट्टीची दारू, बनावट ताडी या सर्वांना प्रतिबंध घालावा, म्हणून निवेदन दिले आहे.

ज्येष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार रुजू झाल्या दिवशीच कुमठा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते सुनील केंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांचा मोठा मोर्चा दारू विक्री करणाऱ्यांच्या घरावर धडकला होता. त्यानंतर त्या ठिकाणी असलेला दारूचा साठा त्या मोर्चातील महिलांनी चव्हाट्यावर आणला होता. एकंदरीत “अधिकारी चांगले पण, हाताखालच्यांनी वेशीला टांगले” म्हणण्याची वेळ उदगीरच्या जनतेला येऊ लागली आहे. कारण अधिकारी प्रामाणिक असूनही काही चालत नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण झारीतले शुक्राचार्य बनलेले हाताखालचे अधिकारी आणि कर्मचारी हे पूर्णपणे निर्ढावलेले आहेत, परिणामतः ग्रामीण पोलीस स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या इच्छापूर्ती हनुमान मंदिराच्या जवळच गांजाची विक्री होत असल्याची ओरड चालू आहे. तोंडार पाटी ते तोंडार आणि लोणी पाटी ते लोणी या चार-पाच किलोमीटरच्या अंतरात अनेक अवैध दारू विक्रेत्यांनी आपले बस्तान बसवलेले आहे. त्यामुळे यासंदर्भात पोलीस प्रशासनाने कारवाई करावी, म्हणून वेळोवेळी निवेदन दिलेले आहेत. मात्र त्या सर्व निवेदनांना केराची टोपली दाखवत पोलीस प्रशासनातील कर्मचारी या अवैध धंदेवाल्यांना चालना देत आहेत. अशीही चर्चा जोर धरू लागली आहे.

दुसऱ्या बाजूला कौलखेड हद्दीमध्ये चालू असलेल्या अवैध हातभट्टीच्या अड्यावर त्या बीटच्या अंमलदारांनी धाडसूत्र टाकून अवैध दारू विक्रीला प्रतिबंध घालण्याचा प्रयत्न केला आहे. यासंदर्भात पोलीस सूत्राकडून हाती आलेली माहिती अशी की, कोळखेड तालुका उदगीर येथील पत्र्याच्या शेडमध्ये हातभट्टीची दारू बनवली जात आहे. व साठवून, विक्री केली जात आहे. अशी गोपनीय माहिती हाती आल्यानंतर पोलिसांनी धाड टाकून आरोपी नितीन नामदेव चव्हाण यांच्याकडून आंबट उग्र वास येत असलेले गुळ मिश्रित फसफसणारे रसायन 700 लिटर याची किंमत प्रति लिटर साठ रुपये प्रमाणे 42000 तसेच आंबट उग्र वास येत असलेली तयार गावठी हातभट्टी दारू वीस लिटर प्रति लिटर शंभर रुपये याप्रमाणे अंदाजे किंमत दोन हजार रुपयेचा माल जप्त करण्यात आला आहे.या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गु. र. क्रमांक 89/ 23 कलम 65 (ड) (ई) महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये फिर्यादी शिवप्रताप किशनराव रंगवाळ याच्या फिर्यादीवरून रीतसर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल रंगवाळ हे करत आहेत.

About The Author