मनपाला जागे करण्यासाठी नगरसेवक कव्हेकर यांची नाली सफाईतून गांधीगिरी

मनपाला जागे करण्यासाठी नगरसेवक कव्हेकर यांची नाली सफाईतून गांधीगिरी

लातूर (प्रतिनिधी) : शहरातील स्वच्छतेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत आहे. याबाबत महापौराकडे चर्चा करूनही स्वच्छतेचा प्रश्न पूर्णपणे मार्गी लागत नाही. लातूर महानगरपालिकेमध्ये भाजपाची सत्ता असताना शहरातील नाली स्वच्छते चा विषय मार्गी लावण्यासाठी प्रत्येक प्रभागात पंधरा ते वीस जणांची टिम पूर्णवेळ होती व त्याला सपोर्ट करण्यासाठी 70 जणांची अतिरिक्त टिम करण्यात आली होती जी टीम महिन्यातून प्रत्येक प्रभागात एक दोन वेळेस जाऊन हमला पद्धतीने नाल्या साफ करत असत. परंतु आता मात्र, केवळ पंधरा ते 20 कर्मचार्यावर प्रत्येक वार्डातील पूर्ण स्वच्छतेची जबाबदारी टाकण्यात आलेली आहे. त्यातील अर्धे कर्मचारी गैरहजर राहतात. त्यामुळे आहे त्या कर्मचार्यावर अतिरिक्त कामाचा ताण पडत आहे. त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लागत नाही. परिणामी शहरात जागोजागी नाल्या तुंबल्या असल्याचे चित्र दिसून येत आहे. ही बाब लक्षात घेवून महापौराकडे विषय न मांडता भाजपा युवा नेते तथा नगरसेवक अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी गांधीगिरी पध्दतीचा अवलंब करून शहरातील प्रभाग क्र.18 मधील माताजी नगर पसिरातील नालीची स्वच्छता करून स्वच्छ आणि सुंदर लातूर करण्याचा संदेश विद्यमान महापौरांना दिलेला आहे. त्यांच्या या विधायक कृतीचा आदर्श इतर नगरसेवकासाठी प्ररेणादायी ठरणार आहे.

शहरातील 18 प्रभागातील स्वच्छतेचे कामे करण्यासाठी प्रत्येक प्रभागात पूर्णवेळ पंधरा ते वीस स्वच्छता कर्मचार्याची टिम तयार करण्यात आली. भाजपाची सत्ता असताना या स्वच्छतेच्या टिमबरोबरच एक वेगळी 70 स्वच्छता कर्मचार्यांची हमला टिम तयार करण्यात आली. व ती टिम शहरातील सर्वच प्रभाग व वार्डामध्ये जाऊन स्वच्छतेचे काम करीत असे या कामातील सातत्यामुळे लातूर शहरातील स्वच्छतेची नोंद केंद्र शासनाने घेतली. आणि त्या वेळी लातूर महानगरपालिकेला देशात पहिला स्वच्छतेचा पुरस्कार मिळाला ही बाब लातूरकरांसाठी स्वाभिमानाची बाब आहे. परंतु नंतर झालेल्या महानगरपालिकेतील सत्ताबदलानंतर काँग्रेसच्या हातात मनपाची सत्ता गेली. परंतु त्यानंतर त्यांनी शहरातील स्वच्छतेकडे म्हणावे तसे लक्ष दिलेले नाही. त्यामुळे पुन्हा शहरातील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. जागोजागी कचर्याचे ढिग, नालीही तुंबलेल्या दिसून येत असल्यामुळे लातूकरांच्या आरोग्याचा गंभीर बनलेला आहे. याबाबत शहरातील अनेक नगरसेवकांनी महापौरांच्या नजरेस आणून देण्याचे काम केलेले आहे. शहरातील सर्वच प्रभागातील स्वच्छतेचा प्रश्न ऐनवेळी मार्गी लावणारी 70 जणांची हमला टिमही बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे शहरातील स्वच्छतेचा प्रश्न नागरिकांनी मांडायचा तरी कोणाकडे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. हे वास्तव असले तरी शहरातील स्वच्छतेच्या प्रश्नांबाबत लक्ष द्यायला विद्यमान महापौरांना वेळच नाही. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या अडचणी लक्षात घेवून भाजपा युवा नेते तथा नगरसेवक अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी गांधीगिरी पध्दतीचा अवंलब करून शहरातील प्रभाग 18 मधील माताजी नगर परिसरात स्वतः पुढाकार घेवून या भागातील नाल्यांची स्वच्छता केली. यावेळी त्यांच्या समवेत संतोष जाधव, गोविंद सुर्यवंशी, महादेव पिटले यांच्यासह भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची या सामाजिक कार्यासाठी सक्रीय उपस्थिती होती.

निम्म्या कर्मचार्यावरच स्वच्छतेचा भार

शहरातील प्रत्येक प्रभागातील स्वच्छतेसाठी पंधरा ते वीस कर्मचार्‍यांची टिम असते. परंतु त्यातीलही तीन-चार कर्मचारी गैरहजर असतात. त्यामुळे आहे त्या तुटपुंज्या कर्मचार्यांवर त्या-त्या प्रभागातील स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावावा लागतो. यामुळे आहे त्या कर्मचार्यावर अतिरिक्त ताण पडतो. याकडे मनपाचे लक्ष नाही. त्यातच ऐनवेळी येणारी 70 जणांची हमला टिमही बंद करण्यात आली असल्यामुळे लातूर शहर पुन्हा दुर्गंधीच्या विळख्यात येत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे लातूर महानगरपालिकेने लक्ष देवून वाढीव कर्मचारी घेवून तसेच 70 जणांची हमला टिम सक्रीय करून स्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी भाजपा युवा नेते अजितसिंह पाटील कव्हेकर यांनी केली आहे.

About The Author