राज्यकर्त्यांनी शेतीला महत्त्व दिल्यास भारत महासत्ता होईल – माजी कुलगुरू डॉ. मोहम्मद इकबाल अली
अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयात झाले आंतरराष्ट्रीय परिषदेचे थाटात उद्घाटन…!
अहमदपूर (गोविंद काळे) : शेती हे भारताचे सर्वांत मोठे बलस्थान असून हाच भारतीय जनतेचा मुख्य व्यवसाय असतानाही सरकारचे शेतीकडे कमालीचे दुर्लक्ष आहे. अन्नधान्याच्या निर्मितीबाबत भारत प्राचीन काळापासून सक्षम असून, शेतमालाची योग्य निर्यात झाली आणि सरकारने शेतीकडे योग्य लक्ष दिले तर भारत जगात एक महासत्ता म्हणून पुढे येईल, असे प्रतिपादन तेलंगणातील वरंगल येथील सातवाहन विद्यापीठाचे माजी कुलगुरू तथा ज्येष्ठ अर्थ तज्ज्ञ डॉ.मोहम्मद इकबाल अली यांनी केले.
येथील महात्मा फुले महाविद्यालयाच्या सुसज्ज सभागृहात नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि महात्मा फुले महाविद्यालयाच्या ग्रंथालय शास्त्र विभागाच्या वतीने ‘ जागतिक दृष्टिकोनातून भारत’ या विषयावर आयोजित केलेल्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय आंतरविद्याशाखीय परिषदेत उद्घाटक म्हणून ते बोलत होते. भारताला मिळालेल्या जी ट्वेंटीचे अध्यक्षपद आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री. श्रीरंगराव पाटील हे होते. तर बीजभाषक म्हणून चीन येथील ग्वांगटोंग विद्यापीठाचे परकीय भाषा विभाग प्रमुख जागतिक संस्कृतीचे अभ्यासक प्रा. डॉ. विवेक मणी त्रिपाठी, किसान शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री. माधवराव पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील, उपप्राचार्य डॉ. दुर्गादास चौधरी, संयोजक ग्रंथपाल प्रा. परमेश्वर इंगळे, महात्मा फुले विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. बी.आर.काबरा, श्री. भागवत मुसणे हे उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना डॉ. मोहम्मद इकबाल अली म्हणाले की, १९९० साली भारत सरकारने खुले आर्थिक धोरण स्वीकारले. इतर सर्व व्यवसायांना उद्योग म्हणून मान्यता मिळाली. मात्र शेती हा प्रचंड मोठा व्यवसाय असूनही त्याला उद्योगाची मान्यता मिळाली नाही. शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणाऱ्या योजना शासनाने आणल्या तर त्यांचे उत्पादन वाढेल आणि अन्नधान्याच्या निर्यातीमुळे भारताची जागतिक बाजारात पतही वाढेल. म्हणून सरकारने शेती व्यवसायाकडे लक्ष दिले पाहिजे, त्याचबरोबर सामान्य जनतेनेही शेती आणि शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे, असेही ते यावेळी म्हणाले.
यावेळी बीजभाषक म्हणून बोलताना चीन येथील ग्वांगटोंग विद्यापीठाचे प्रोफेसर डॉ. विवेक मणी त्रिपाठी म्हणाले की, जगातील प्रमुख चार प्राचीन संस्कृतीपैकी प्राचीन भारतातील सिंधू संस्कृती ही एक महत्त्वाची संस्कृती असून, गेल्या दोन हजार वर्षांपासून चीनवर भारतीय संस्कृतीचा प्रभाव आहे. भारतीय बौद्ध तत्त्वज्ञान चीनने स्वीकारले असून त्यामुळे चीनचा प्रचंड विकास झाला आहे, असेही ते यावेळी म्हणाले. या आंतरराष्ट्रीय परिषदेचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील यांनी केले. यावेळी त्यांनी महात्मा फुले महाविद्यालयाचा परिचय प्रमुख पाहुण्यांना करून दिला.
यावेळी परिषदेच्या निमित्ताने प्रकाशित होणाऱ्या शोधनिबंधसंग्रहाच्या मुखपृष्ठाचे तसेच डॉ. मारोती कसाब, डॉ. सोमनाथ कदम व डॉ.सतीश ससाणे यांनी संपादित केलेल्या ‘समतावादी आण्णा भाऊ साठे’ या ग्रंथाचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कु. वैष्णवी स्वामी, ज्योत्स्ना मचकंटे, गायत्री पदमपल्ले या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. या उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. आतिश आकडे यांनी केले, तर संयोजक प्रा. परमेश्वर इंगळे यांनी सर्वांचे आभार मानले. या परिषदेत दोनशेच्यावर विद्यार्थी, संशोधक, प्राध्यापक सहभागी झाले होते.