वन विभागाने हत्तीबेट पर्यटनाकडे पाठ फिरवली, न्याय मागण्यासाठी २४जणांचे उपोषण
उदगीर (एल.पी.उगीले) : लातूर जिल्ह्यातील देवर्जन येथील अध्यात्मिक,पौराणिक व ऐतिहासिक महत्त्व असलेल्या हत्तीबेट ‘ब’वर्गीय पर्यटन स्थळाकडे वन विभागाने कायमची पाठ फिरवल्याने तेथील विकास कामांना खीळ बसली आहे. शिवाय तेथील मजुरांच्या हाताला काम नसल्यामुळे मजुरांची उपासमार सुरू झाल्यामुळे न्याय मागण्यांसाठी हत्तीबेटावर काम करणाऱ्या २४जणांनी उस्मानाबाद येथील विभागीय वन अधिकारी यांच्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
लातूर जिल्ह्यातील हत्तीबेट’ब’वर्गीय पर्यटन स्थळ हे वन विभागाच्या ताब्यात आहे.या ठिकाणी सुरू असलेल्या रोपवाटिकेवरील मजुरांकडून झाडांना पाणी देणे,लागवड केलेल्या झाडांची निंदणी, खुरपणी, गवत कापणे,रोपांची लागवड करून परिसराची स्वच्छता करणे, शिवाय हत्तीबेटावर दररोज पर्यटक, भाविकांना पिण्याचे पाणी व अन्य सुख सोयी उपलब्ध करून देण्याचे काम केले जाते. मात्र वन विभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी, वन परिमंडळ अधिकारी व वनरक्षक हे सहा सहा महिने हत्तीबेटाला भेट देत नसल्यामुळे तेथील कामांचा पुरता बोजवारा उडाला आहे. रोपवाटिकेचेही काम बंद असल्यामुळे मजुरांची उपासमार सुरू झाली आहे.
हत्तीबेटावर पर्यटन विकासाची कामे करण्यासाठी कृती आराखडा ,अंदाजपत्रके तयार करून यासाठी निधीची मागणी व प्रशासकीय मान्यता घेण्यासाठी वन विभागाकडून पाठपुरावा करणे गरजेचे असताना या विभागाकडून ही कामे करण्यासाठी गेल्या १२वर्षांपासून कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.
हत्तीबेटाच्या देखभालीसाठी व पर्यटन विकासासाठी वन विभागाचे मोठे दुर्लक्ष होत आहे. वनविभागाकडून कोणतीच कार्यवाही होत नसल्यामुळे न्याय मागण्यांसाठी २४जणांनी उस्मानाबाद येथील विभागीय वन कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
हत्तीबेटावर सुरू असलेल्या दोन्ही रोपवाटिकेची कामे करून मजुरांना तात्काळ काम उपलब्ध करून द्यावे, मागील दोन महिन्याची थकीत मजुरी त्यांना देण्यात यावी, हत्तीबेटावर सेंट्रल नर्सरी सुरू करून मजुरांना कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून द्यावा, हत्तीबेटावर दररोज वन रक्षकास येणे बंधनकारक करण्यात यावे, हत्तीबेट विकास कामांचा बृहत आराखडा ,विकास कामांची अंदाजपत्रके तात्काळ तयार करून पर्यटन व जिल्हा नियोजन विभागाकडे निधीची मागणी करण्यात यावी.हत्तीबेटावर उर्वरित शिल्लक क्षेत्रावर नवीन वृक्ष लागवड करण्यात यावी. अशा महत्त्वाच्या मागण्यांसाठी हत्तीबेट प्रकल्पाच्या विकासासाठी व्ही. एस. कुलकर्णी, सचिन सूर्यवंशी, राम बतले, श्रीधर नेलवाडे, गणेश चव्हाण, संदीपान सूर्यवंशी, विष्णू संपते, बाबू राठोड,लक्ष्मण यलमट्टे, राम बोंबीले, दशरथ बंडगर, अण्णाराव पिटले, रामदास संपते, सुनीता राठोड, रेणुका चव्हाण, सुनीता चव्हाण, सुमन चव्हाण, सुरेखा चव्हाण, क्रांती सूर्यवंशी, शेवंताबाई पल्लेवाड, जयदेवी माचोळे, महानंदा माचोळे, कविता चव्हाण उपोषणाला बसले आहेत.
दरम्यान उपोषणकर्त्यांनी न्याय मिळेपर्यंत बेमुदत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. उपोषण कर्त्यांचा तिसरा दिवस आहे.