आजचा कार्यकर्ता भाजपात उद्याचा नेता होवू शकतो – प्रदेश सरचिटणीस केनेकर
लातूर (एल.पी.उगीले) : भाजपाच्या केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची चर्चा गावागावात बुथ स्तरावर भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी घडवून आणावी. ज्या कार्यकर्तेमुळे पक्ष वाढतो, तो कार्यकर्ता उभा राहिला पाहिजे. असे सागून कामातून, भूमिकेतून जनतेच्या मनात कार्यकर्ता किती रुजतो हे महत्वाचे आहे. आजचा कार्यकर्ता उद्याचा नेता भाजप पक्षातच होवू शकतो. असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेश सरचिटणीस संजय केनेकर यांनी केले.
भारतीय जनता पक्ष लातूर जिल्हा कार्यकारिणीची बैठक औसा येथील विजय मंगल कार्यालयात भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून संजय केनेकर बोलत होते. या बैठकीस जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर, खा. सुधाकर श्रंगारे, आ. अभिमन्यू पवार, प्रदेश उपाध्यक्ष माजी मंत्री विनायकराव पाटील, प्रदेश सचिव अरविंद पाटील निलंगेकर, प्रदेश प्रवक्ते गणेश हाके, किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस दिलीपराव देशमुख (मालक), माजी खासदार सुनील गायकवाड, माजी आमदार बब्रुवान खंदाडे, जिल्हा सरचिटणीस संजय दोरवे, विक्रमकाका शिंदे, त्र्यंबकआबा गुट्टे, अशोक काका केंद्रे, रामचंद्र तिरुके, जिल्हा प्रभारी संतोष मुक्ता, जिल्हा भाजपाचे अमोल पाटील, भागवत सोट, श्रीमती रेखाताई तरडे, मीनाक्षी पाटील, कल्पनाताई डांगे, दगडू साळुंखे, भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष जाधव, सुनील उटगे, शहराध्यक्ष लहू कांबळे, गोविंद चिलकुरे, रोहिदास वाघमारे, संध्या जैन, मुक्तेश्वर वागदरे, अमोल निडवदे यांच्यासह अनेकांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीस जिल्ह्यातील भाजपचे प्रदेश आणि जिल्हा पदाधिकारी, मंडल पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत माजी पालकमंत्री आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी राजकीय ठराव मांडून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना राज्याच्या विकासाची बसलेली घडी विस्कळीत करण्याचे काम गेल्या अडीच वर्षात उद्धव ठाकरे सरकारने केले. राज्यातील रोजगार व गुंतवणूक घटली. राज्याला मागे घेऊन जाण्याचे काम झाले असल्याचा आरोप केला. वॉटर ग्रीड प्रकल्पासह अनेक लोक कल्याणकारी बंद पडलेल्या योजना राज्यात नव्याने आलेल्या शिंदे फडणवीस सरकारने सुरू केल्या असल्याची माहिती देवून मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी भरीव निधी देणार असल्याची घोषणा करणाऱ्या या राज्य सरकारच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. या ठरावाला अनुमोदन देताना गणेश दादा हाके यांनी अभद्र युतीतील उद्धव ठाकरे यांच्या सरकारने शेतकऱ्यांना कसल्याही प्रकारची मदत केली नसल्याची टीका करून वैधानिक विकास महामंडळ राज्य शासनाने सुरू केल्याबद्दल अभिनंदन केले.
कृषी व सहकार विषयक ठराव मांडताना आ. अभिमन्यू पवार म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने एकही शेतकरी हिताचा निर्णय घेतला नाही. उलट शेतकऱ्यांच्या दुष्टीने महत्त्वाच्या आशा अनेक योजना बंद करून शेतकर्यांना धोका दिला. सुडबुध्दीने विकासाच्या योजना बंद केल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारने लातुर जिल्ह्य़ातील गोगलगाय प्रादुर्भावसह अतिवृष्टी व संततधार पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर करुन आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक 421 कोटींची मदत केली. साखर उद्योगांना स्थिरता यावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीयमंत्री अमित शाहा यांनी निर्णय घेऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला असे सांगितले. या ठरावास अनुमोदन देताना विनायकराव पाटील आणि खा. सुधाकर शृंगारे यांनी केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या कृषी विषयक धोरणाची माहिती देऊन अनुमोदन दिले.
यावेळी संजय केनेकर पुढे म्हणाले की, भाजप पक्षात कार्यकर्त्यांचे महत्त्व अधिक असून कार्यकर्त्याच्या कामावरच देशात भाजपाने उतुंग यश मिळविले. पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्रशासन आणि राज्यातील शिंदे फडणवीस यांच्या सरकारने घेतलेल्या विविध निर्णयाची माहिती, जनजागृती खेड्यापाड्यात बुथ स्तरापर्यंत करावी असे आव्हान केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्य सरकारने औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण केल्याबद्दल अभिनंदन करून संजय केनेकर म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर असताना धर्मविर नव्हते, अशी भूमिका घेणाऱ्या अजित पवारांना मराठवाड्यात पाय ठेवताना दहा वेळा विचार करावा लागेल, असा बंदोबस्त भाजपाच्या युवा मोर्चाने करावा. असेही संजय केनेकर यांनी बोलून दाखविले.
यावेळी बोलताना भाजपचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड म्हणाले की, पक्षाच्या संघटन आणि लोकप्रतिनिधी संख्या बाबतीत राज्यात लातूर जिल्हा एक नंबर असून या पुढील काळातही एक नंबर ठेवण्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे. ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपाच्या ताब्यात आलेल्या सर्व ग्रामपंचायतींना वीस लाख रुपयांचा विकास निधी राज्य शासन देणार असल्याची माहिती देऊन कार्यकर्त्याला ताकद द्यावी लागेल, असे बोलून दाखविले, या बैठकीचे सुत्रसंचालन दिपक चाबुकस्वार यांनी केले. भाजपाचे जिल्हा प्रभारी संतोषअप्पा मुक्ता यांनी आभार मानले.